रवींद्र टोंगे यांनी उपोषण सोडलं; उपमुख्यमंत्र्यांनी नेमकं काय आश्वासन दिलं?
OBC Reservation | ओबीसींच्या आरक्षणासाठी (OBC Reservation) रवींद्र टोंगे (Ravindra Tonge) यांनी उपोषण पुकारलं होतं. तर अखेर 20 दिवसांनंतर आज (30 सप्टेंबर) त्यांनी उपोषण सोडलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिलेल्या आश्वासनानंतर टोगेंनी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला. तर देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ज्यूस घेत टोंगेंनी उपोषण सोडलं.
कुणालाही ओबीसींच्या आरक्षणात वाटेकरी करू नये या मागणीसाठी रवींद्र टोंगे यांनी मागील 20 दिवसांपासून उपोषण सुरू केलं होतं. त्यांच्यासोबत प्रेमानंद जोगी आणि विजय बलकी यांनीही उपोषण सुरू केलं होतं. तर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या तिघांनाही ज्यूस देत त्यांचं उपोषण सोडलं. यावेळी ओबीसी नेते बबनराव तायवाडे, वन मंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय आश्वासन दिलं?
ओबीसींना आश्वासन देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्य सरकार ओबीसींच्या पाठीशी आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. तसंच मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल पण ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागून देणार नाही. सरकारची ओबीसींच्या कोणत्याही मुद्द्यावर नकारात्मक भूमिका नसून आम्ही सकारात्मक आहोत.
काल मुख्यमंत्र्यांनी ओबीसी नेत्यांशी अडीच तास चर्चा केली. त्यावेळी त्यांचे सर्व प्रश्न निकाली लागले. तसंच अजूनही काही प्रश्न असतील तर त्यावर आम्ही चर्चा करायला तयार आहोत. ओबीसींचे सर्व प्रश्न आम्ही सोडणार आहोत, असंही देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं.