शिवसेनेच्या कोणत्या खासदारानं का सोडली शिवसेना? वाचा सविस्तर!

शिंदे गटाला बेन्टेक्स अन् शिवसेनेला सोने म्हणणारे संजय मंडलिक शिंदे गटात
शिवसेनेच्या शिंदे गटाचा प्रभाव, चंद्रकांत पाटील, महाडिक परिवार, समरजितसिंह घाटगे, प्रकाश आबिटकर या सर्वांची कुमक मिळाल्यास २०२४ ला दुसऱ्यांदा लोकसभेत पोहोचणे सहज शक्य आहे. या सर्वांचा विचार करून संजय मंडलिक हे खासदारकी वाचवण्यासाठी शिंदे गटात दाखल झाले आहेत.
संस्थात्मक हितसंबंध डोळ्यांसमोर ठेवत हेमंत पाटील शिंदे गटात
सुरुवातीच्या काळात हेमंत पाटील हे राज ठाकरे यांच्या जवळचे मानले जात. पण राज ठाकरे बाहेर पडल्यानंतरही शिवसेनेत राहणारे हेमंत पाटील बदलले कसे, तर संस्थात्मक हितसंबंध डोळ्यांसमोर ठेवत हेमंत पाटील शिंदे गटात गेले असल्याची चर्चा हिंगोलीमध्ये सुरू झाली आहे.
केवळ २०२४ मधील विजयासाठी कृपाल तुमाने शिंदे गटात
कृपाल तुमाने यांना वाटले २०२४ ची लोकसभचीे सार्वत्रिक निवडणूक भाजपच्या मदतीशिवाय जिंकू शकत नाही हे सप्ष्ट झाल्यावर तुमानेंची ठाकरे कुटुंबियांवरील निष्ठा ढळली. आणि यामुळंच त्यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला.
मुलाच्या राजकीय भविष्यासाठी प्रतापराव जाधव यांनी तोडले ३३ वर्षांचे ऋणानुबंध
बुलडाणा जिल्हा परिषद निवडणुकीत प्रतापराव जाधव यांचे पुत्र ऋषिकेश जाधव यांना पराभवाचा धक्का बसला होता. जाधव यांनी दोन विश्वासू आमदारांपाठोपाठ खासदार जाधवही शिंदे यांच्या तंबूत दाखल झाले आहेत.
शिवसेनेची साथ सोडण्याची माने घराण्याची दुसरी वेळ
धैर्यशील माने यांनी खासदारकीची संधी देणाऱ्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत शिंदे गटाची वाट धरली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या आजी-माजी आमदारांचा शिंदे गटात जाण्याचा निर्णय व भाजपची वाढती ताकद यामुळे धैर्यशील माने यांनी २०२४ मध्ये पुन्हा लोकसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी राजकीय सोय म्हणून शिंदे गटात सामील होण्याच निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.
‘ईडी’ची पिडा टाळणे हेच भावना गवळी यांचे लक्ष्य
भावना गवळी यांच्या समर्थकांनी यवतमाळमध्ये शिंदे गटात प्रवेश केला. आता भावना गवळी यांनी शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यात शिंदे गटात प्रवेश केल्याने या विषयावर अधिकृत पडदा पडला. गवळी यांनी त्यांच्यावरील सक्तवसुली संचालनालयाची कारवाई थांबावी व केंद्रात मंत्रिपद मिळावे यासाठी ही भूमिका घेतल्याची चर्चा जिल्ह्यात आहे.
श्रीरंग बारणे – आधी पक्षनिष्ठेचे दर्शन, नंतर बंडखोरांचे समर्थन
बारणे दुसऱ्यांदा खासदार झाले, तेव्हा प्रथमच लोकसभेवर निवडून आलेल्या श्रीकांत शिंदे यांच्याशी त्यांची मैत्री झाली. पुढे खासदार शिंदे व त्यांचे वडील एकनाथ शिंदे यांच्यातील बारणे यांचे संबंध दृढ झाले. २०२४ च्या लोकसभेच्या दृष्टीनं श्रीरंग बारणे यांनी शिंदे गटात प्रवेश केला.
राहुल शेवाळे: सत्तेसाठी सोयीची जुळवाजुळव हेच कायमचे तंत्र
शिवसेना आणि भाजप युती दुभंगल्याबाबत शेवाळे यांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. २०२४ मधील लोकसभा निवडणूक जिंकायची तर भाजपची साथ आवश्यक असे शेवाळे यांच्या मतदारसंघातील समीकरण आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतरही दिल्लीत शेवाळे यांनी भाजपच्या नेत्यांशी व मंत्र्यांशी चांगले संबंध टिकवले. आता शिंदे गटात दाखल झाल्यानंतर शेवाळे हे त्यांचे लोकसभेतील गटनेते म्हणून निवडले गेले आहेत. आगामी काळात केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना कॅबिनेट मंत्री म्हणून सत्तेचा लाभ मिळेल अशी दाट शक्यता आहे.