पुण्यात कोहली किंग, तर बुमराहचा स्विंग, एमसीएच्या मैदानाचे दोघचं सामनावीर? आकडेवारीत स्पष्ट
पुणे : (Records Maharashtra Cricket Association Stadium Pune) पुण्यातील मैदानात गुरुवारी भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये लढत होणार आहे. विश्वचषकाच्या या सामन्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. भारताने सलग तीन विजयासह दमदार सुरुवात केली आहे. आता 19 ऑक्टोबर रोजी दुपारी भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये ‘काटें की टक्कर’ होणार आहे. दुपारी दोन वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे.
पुण्यातील मैदानात धावांचा पाऊस पडतो. एमएसीच्या मैदानावर चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळणार आहे. फलंदाजांसाठी हे मैदान स्वर्ग मानले जाते. सपाट खेळपट्टीवर विराट कोहली, रोहित शर्मा धावांचा पाऊस पाडू शकतात. विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांचा या मैदानावर चांगला रेकॉर्ड आहे.
पुण्याच्या एमसीए मैदानावर विराट कोहलीने धावांचा पाऊस पाडला आहे. विराट कोहलीने सात एकदिवसीय सामन्यात 64 च्या सरासरीने 448 धावा चोपल्या आहे. विराट कोहलीने पुण्याच्या मैदानावर दोन शतके आणि तीन अर्धशतके ठोकली आहेत. पुण्याच्या एमसीए मैदानावर भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर जसप्रीत बुमराहचा क्रमांक लागतो. बुमराहने तीन डावात 8 विकेट घेतल्या आहेत. 35 धावांच्या मोबदल्यात चार विकेट, बुमराहची सर्वोत्तम गोलंदाजी आहे.
कुणाचं पारडं जड?
भारत आणि बांगलादेश यांच्यात आतापर्यंत एकूण 40 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. यामध्ये भारताचं वर्चस्व पाहायला मिळालं आहे. टीम इंडियाने 31 सामने जिंकले आहेत, तर 8 बांगलादेशने विजय मिळवला आहे. त्यामुळे टीम इंडिया विरोधातील आगामी सामना जिंकणं बांगलादेशसाठी सोपं नसेल. बांगलादेशला कडव्या स्पर्धेला सामोरं जावं लागणार.