राज्यात कंत्राटी नोकर भरतीला लागला वेग
मुंबई | Maharashtra News – राज्यात ७५ हजार जागांची भरती करण्यात येणार असल्याची राज्य सरकारच्यावतीने काही दिवसांपूर्वी घोषणा करण्यात आली. इतकेच नव्हे तर तलाठी आणि आरोग्यसेवकांच्या भरतीची प्रक्रिया सुरु देखील करण्यात आली. परंतु एकीकडे ही प्रक्रिया सुरु असताना दुसरीकडे शासनाच्यावतीने कंत्राटी तत्वावर नियुक्त्यांची प्रक्रिया ही सुरु झाली. त्यासाठी काही खासगी कंपन्यांना कंत्राट ही देण्यात आले. त्यामुळेच राज्यभरातील युवक वर्गात आक्रोश निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.
एकूण नऊ कंपन्यांना कंत्राट देण्यात आले. याच कंपन्यांच्या माध्यमातून तब्बल ८६ संवर्गातील जागा भरण्यात येणार आहेत.
राज्यशासनाच्या जीआरमध्ये प्रामुख्याने शासन विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, कृषी महाविद्यालये अशा प्रमुख विभागांचा समावेश आहे. तसेच ही भरती पाच वर्षांसाठी असणार आहे. या भरतीला कोणतेही आरक्षण लागू होणार नसून सरळ सेवेच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. यामध्ये २३ हजार ते २ लाख रुपयांपर्यंतचे पगार असलेल्या पदांची भरती प्रक्रिया असेल.
कंत्राटी भरतीविरोधात राज्यात आंदोलने
राज्यात सुरु असलेल्या या भरती प्रक्रियेवरुन नांदेड, अमरावती, जालना, वर्धा, यवतमाळ याठिकाणी जोरदार आंदोलने सुरु आहेत. मुंबईत देखील लवकरच हा वणवा पेटताना पाहिला मिळणार आहे. त्यामुळे काही राजकीय व्यक्तींच्या फायद्यासाठी सरकार हा निर्णय रेटून नेणार की कंत्राटी तत्वावर सुरु असलेली भरती प्रक्रिया थांबवणार हे लवकरच स्पष्ट होणार होईल.
या कंपन्यांना कंत्राट देण्यात आले
- अँक्सेंट टेक सर्व्हिसेस लिमिटेड
- सी.एम.एस. आयटी सर्व्हिसेस प्रा.लि.
- सी.एस.ई.- गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लि.
- इनोवेव आयटी इन्फ्रास्ट्रक्चर लि.
- क्रिस्टल इंटग्रेटेड सर्व्हिसेस प्रा.लि.
- एस-२ इन्फोटेक इंटरनॅशनल लि.
- सैनिक इंटेलिजन्स सिक्युरिटी प्रा.लि
- सिंग इंटेलिजन्स सिक्युरिटी सर्व्हिसेस प्रा.लि
- उर्मिला इंटरनॅशनल सर्व्हिसेस प्रा.लि.