‘सुवर्णसंपदा’ स्मरणिकेचे प्रकाशन व संपदा समाजकल्याण पुरस्कार वितरण
नागरी सहकारी बँकेची स्थिती पाच वर्षात चांगली झाली आहे. नेट एनपीए दोन टक्क्यांपेक्षाही कमी आहे. हे सर्व करताना या बँकांसमोर अनेक आव्हाने आहेत. व्यवस्थापन, शासन आणि जोखीम व्यवस्था या गोष्टींकडे लक्ष द्यावे लागेल. नागरी सहकारी बँका अधिक मजबूत झाल्या पाहिजेत, असे मत रिझर्व बँक ऑफ इंडियाचे संचालक सतिश मराठे यांनी व्यक्त केले.
संपदा सहकारी बँक लि. पुणे च्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा सांगता सोहळा मुक्तांगण सभागृह, पुणे विद्यार्थी गृह, तावरे कॉलनी, शिवदर्शन येथे आयोजित करण्यात आला आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियाचे संचालक सतिश मराठे व प्रमुख पाहुणे ज्येष्ठ अर्थ तज्ञ डॉ. विनायक गोविलकर , अध्यक्षस्थानी इस्कॉनचे श्रद्धेय अनंत गोप प्रभुम्हणून उपस्थित होते. यावेळी बँकेचे अध्यक्ष अश्विनीकुमार उपाध्ये, बँकेचे उपाध्यक्ष महेश लेले, मुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश सरदेशपांडे, व्यवस्थापन मंडळ अध्यक्ष मुकुंद भालेराव आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात महाराष्ट्र असंघटित कामगार संघटना यांना संपदा समाज कल्याण पुरस्कार प्रदान करण्यात आला. रुपये ५१,०००/- आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. दिनांक २ ऑगस्ट १९७४ रोजी स्थापन झालेल्या बँकेचे २०२३-२४ हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. कार्यक्रमात बँकेच्या सुवर्णसंपदा या स्मरणिकेचे प्रकाशनही झाले. प्रकाशक भालचंद्र कुलकर्णी यांचा सन्मान यावेळी करण्यात आला.
सतिश मराठे म्हणाले, जगातील मोठ्या अर्थव्यवस्थेत सलग तिसऱ्या वर्षी जलदवृद्धी होणारी आपली अर्थव्यवस्था आहे. पायाभूत सुविधांना सरकार मोठी चालना देत आहे. त्यामुळे खाजगी क्षेत्रांची गुंतवणूक सगळ्या क्षेत्रांमध्ये वाढली. रिसर्च, आयटी डेव्हलपमेंट, इनोवेशन या सगळ्या क्षेत्रात आपण पुढे आहोत त्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेला गती आहे. परकीय गुंतवणूक आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर होत आहे. जगाचा विश्वास भारताच्या अर्थव्यवस्थेवर आहे हे दिसून येते. छोट्या छोट्या दुकानात डिजिटल पेमेंट मुळे उत्पन्न पातळी तयार झाली आणि त्यामुळे कर्ज मिळणे सोपे झाले. कर्ज देण्याच्या अनेक संधी या बँकांसमोर आहे ते कारण ग्रामीण भागात शेती प्रक्रियेवर आधारित अनेक उद्योग भविष्यात वाढणार आहेत.
विनायक गोविलकर म्हणाले, आपल्या देशातील सहकारी बँकावर टीका करणारे बरेच आहेत. यावर नीट विचार करण्याची गरज. केवळ संचालकांची जबाबदारी नाही तर सगळ्या स्टेकहोल्डरची जबाबदारी असेल तर ती बँक सक्षम होते. बँकांचे महत्व सामान्य जनतेसाठी महत्वाचे आहे. वित्तीय साक्षरता आणि शिस्त बँकेत खाते असल्याने येते. आर्थिक विकास करायचा असेल तर लोकांकडे असलेले धन बँकेत आले पाहिजे. लोकांना बँकिंग प्रवाहात आणले पाहिजे तरच पाचव्या क्रमांकावरून भारतीय अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर येईल. बँकिंग क्षेत्रात नव्याने प्रवेश करणाऱ्यांसाठी सहकारी बँका या वरदान आहेत. त्यांचा वैयक्तिक संपर्क आणि सल्ला त्यामुळे नाते जोडले जाते आणि त्याचा उपयोग ग्राहकांना आणि देशाच्या अर्थव्यवस्थेलाही होतो.
अश्विनीकुमार उपाध्ये म्हणाले, एनपीए वर सर्व कर्मचारी आणि अधिकारी वर्गाने जोमाने काम केले म्हणून एनपीएचे प्रमाण शून्य आहे. भारताची अर्थव्यवस्था अन्य देशांच्या तुलनेने जलद पुढे जात आहे हे लक्षात घेत अनेक डिजिटल बदल बँकेत करण्यात आले आहेत. बँकेचा डाटा सुरक्षित रहावा यासाठी मायक्रोसॉफ्टच्या क्लाऊड टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे.
महेश लेले म्हणाले, बँकेला ऑडिट वर्ग अ मिळाला आहे. बँक सर्व आघाडीवर सक्षम झाली असून ग्राहकांचा विश्वास बँकेने संपादित केला आहे. मागील २ वर्षांपासून बँक लाभांश देत आहे तसेच महिला सक्षमीकरणासाठी देखील योजना बँकेने आणल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले. गिरीश सरदेशपांडे यांनी आभार मानले.