पुणे

मतदार यादीचा सुधारित विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांचा १ जुलै २०२४ या अर्हता दिनांकाच्या आधारावर सुधारित विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला असून त्यानुसार पात्र नागरिकांनी १६ ऑगस्ट २०२४ पर्यंत मतदार नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे.

डॉ. दिवसे म्हणाले, या कार्यक्रमाअंतर्गत शुक्रवार २ ऑगस्ट रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या प्रारुप यादीच्या अनुषंगाने मतदार यादीवरील दावे व हरकती शुक्रवार (२ ऑगस्ट) ते शुक्रवार (१६ ऑगस्ट) या कालावधीत स्विकारण्यात येणार आहे. प्राप्त हरकती आणि आक्षेपांवर २६ ऑगस्टपर्यंत कार्यवाही करण्यात येईल. त्यांनतर मंगळवार २७ ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

मतदार यादीचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत नवीन मतदारांची नाव नोंदणी करणे, मयत मतदारांचे, स्थलांतरीत मतदाराचे नाव वगळणे, मतदार ओळखपत्रातील त्रुटी दूर करणे, भारत निवडणुक आयोगाच्या मानकानुसार छायाचित्र प्राप्त करून मतदारयादीत सुधारणा करणे, मतदार यादी तयार करणे आदी कामे प्रामुख्याने करण्यात येणार आहेत. प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर मतदारांनी नोंदणी केलेले नाव, पत्ता, वय व इतर तपशील योग्य असल्याची खात्री करून घ्यावी. तसेच त्यात दुरुस्तीची आवश्यकता असल्यास या कालावधीत संबंधित तपशील तपासून घ्यावे, काही बदल असल्यास त्यामध्ये दुरुस्ती करुन घ्यावी.

आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्यावेळी सर्व मतदाराना मतदानाचा हक्क बजावता यावा, याकरीता जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. जिल्ह्यात १८ ते १९ वयोगटातील युवकांचा मतदार प्रक्रियेतील सहभाग वाढविण्यासाठी महाविद्यालयात मतदार नोंदणीसाठी विशेष अभियान राबविण्यात येत आहे, जिल्ह्यातील पात्र नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन त्यांची नावे मतदार यादीत नोंदणी करावीत, असे आवाहन डॉ. दिवसे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये