पुणे : कारगिल ही केवळ विजयाची कहाणी नाही तर ही एक कहाणी आहे अभिमानयुक्त वेदनेची, अशी एक कहाणी जेथे शोकात असतानाही चेहर्यावर हसू होते आणि जिथे मृत्यू हा शेवट नव्हता. २६ जुलै भारतीय सैन्यासाठी शौर्याचा दिवस. दरवर्षी हा दिवस आपल्या शहीद झालेल्या सैनिकांना मानवंदना देण्यासाठी, त्यांनी केलेल्या संघर्षमय वीर बलिदानासाठी हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो.
महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटिन एज्युकेशन सोसायटीच्या एच. जी. एम. आझम कॉलेज ऑफ एज्युकेशन आणि आंतरराष्ट्रीय केंद्र सावित्रीबाई फुले विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानेदेखील ‘कारगिल विजय दिवस साजरा केला. एच. जी. एम. आझम कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या हाय-टेक सभागृहात कार्यक्रम झाला. एच. जी. एम. आझम कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या डॉ. अनिता बेलापूरकर प्रमुख वक्त्या म्हणून, तर प्रा. अंका निकोलाऊ, डॉ. इकॅथरिना डॅनिएला झेका (कुलगुरू युनिव्हर्सिटी ऑफ गलाटी, रोमानिया) उपस्थित होते. कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधून विद्यार्थिनींनी सादर केलेली कारगिल शौर्यगाथा पाहून प्रा. अंका निकोलाऊ अतिशय प्रभावित झाल्या.
एक खास आठवण आम्ही आमच्यासोबत घेऊन चाललो आहोत, असे त्या आवर्जून म्हणाल्या. तसेच त्यांनी विद्यार्थिनींच्या सादरीकरणाचे विशेष कौतुक केले. कार्यक्रमाचे निवेदन प्रा. निलोफर पटेल यांनी केले. बी. ए. बी. एड. व बी. एस्सी. बी. एड.च्या एन्जल जोजफ, बुश्रा शेख, जेबा शेख, जेब मुल्ला, ऐमन शेख या विद्यार्थिनीनी कारगिल युद्धाची पार्श्वभूमी, त्यात शौर्य गाजवलेल्या वीरांची माहिती व कारगिल शौर्यगाथा यासंदर्भात पॉवर पॉईंटच्या सहाय्याने सादरीकरण केले. त्यांना प्रा. अस्फिया अन्सारी यांनी मार्गदर्शन केले. उपप्राचार्या शाहीन अन्सारी, डॉ. माधुरी यादव व प्रा. अस्फिया अन्सारी यांनी कार्यक्रम संयोजनाची धुरा सांभाळली.