पुणे

पुण्यात सांडपाणी गटारांच्या चेंबरची दुरावस्था; नागरिक त्रस्त

पुणे शहरात सध्याच्या स्थितीत पावसाळी गटार व सांडपाण्याची गटारे रस्त्याच्या कडेने न टाकता ती मध्य भागातून टाकण्यात आलेली आहेत. शहरात ५७ हजार ५०० पावसाळी चेंबर आहेत, तर सांडपाणी गटारांच्या चेंबरची संख्या सुमारे एक लाख ५० हजार इतकी आहे. बहुतांश चेंबर रस्त्याला समपातळीत नाहीत. काही ठिकाणी चेंबर खाली आणि रस्ता वर काही ठिकाणी चेंबरची उंची जास्त आणि रस्ता खाली झाला आहे. रस्त्याच्या पातळीपेक्षा खाली असलेल्या चेंबरच्या झाकणावर पावसाळ्यात पाणी जमा होते व चेंबर दिसत नसल्याने त्यात गाडी आदळत आहे. दुचाकीस्वारांची तर तारांबळ उडते आहे. अनेकदा खड्डा चुकविण्याच्या नादात अपघात होता आहे.

प्रशासनाकडून पावसाळी गटारांचे चेंबर, मलनिस्सारण वाहिनीच्या चेंबरची दुरुस्ती केली जात असल्याचा दावा केला जात असला तरी शहरात अनेक ठिकाणी चेंबर खचल्याने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पावसामुळे शहरातील रस्त्यांवरून पाणी वाहत असताना कुठे खड्डा आहे त्याचा अंदाज येत नाही. त्यात परत अचानक खचलेल्या चेंबरमध्ये वाहने आदळत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

हेही वाचा- पालकांची चिंता वाढली; आरटीई प्रवेश प्रक्रिया आणखी लांबणीवर

मुसळधार पाऊस पडला की, शहरातील रस्त्यांची चाळण होण्यास सुरुवात होते. खड्डे पडण्यास रस्त्यातील चेंबर्स कारणीभूत ठरतात. पथ विभागाकडून शहरात पावसाळी गटारांच्या दुरुस्तीचे काम केले जाते, तर मलनिस्सारण विभागाकडून सांडपाणी वाहिन्यांची देखभाल दुरुस्ती केली जाते. या गटारांची स्वच्छता करता यावी, यासाठी ठरावीक अंतरावर चेंबर तयार करून त्याला झाकण लावले जाते.

हेही वाचा- आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकातील कामे पूर्ण करण्याचे महापालिका प्रशासनासमाेर आव्हान

पथ विभाग आणि मलनिस्सारण विभागाकडून १५ क्षेत्रीय कार्यालयांसाठी पावसाळी गटार आणि सांडपाण्याचे गटार यांच्या देखभाल दुरुस्ती, चेंबर बांधणे, झाकण बदलणे यासाठी दरवर्षी लाखो रुपयांची निविदा काढली जाते. त्यातून ठेकेदारांकडून ज्या ठिकाणी चेंबर खचल्याचे दिसते तेथे लगेच दुरुस्ती करणे आवश्‍यक आहे.

हेही वाचा- आषाढी वारीसाठी ‘लालपरी’ सज्ज; पुणे विभागातून तब्बल ‘एवढ्या’ बसेस सोडणार

मात्र, नागरिकांनी तक्रार केल्याशिवाय किंवा चेंबरचे झाकण वाहनांच्या वजनाने फुटल्याशिवाय त्याकडे लक्ष दिले जात नाही. पथ विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार सात कार्यकारी अभियंत्यांच्या हद्दीत रस्त्यातील खड्डे बुजविण्यासह चेंबर दुरुस्तीचे काम सुरू आहे. गेल्या जून २०२३ ते मे २०२४ या कालावधीत ६०५ चेंबर दुरुस्त केलेले आहेत.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये