पुण्यात पिस्तुलचा धाक दाखवत मद्यविक्री दुकानावर दरोडा, साथीदारासह चार जण पोलिसांच्या ताब्यात
पुणे | Pune News : पुण्यात (Pune) एक धक्कादायक घटना घडली आहे. एनडीए रस्त्यावरील उत्तमनगर परिसरात चार तरूणांनी पिस्तुलचा धाक दाखवत मद्यविक्री दुकानावर दरोडा घातला. याप्रकरणी पोलिसांनी चारही आरोपी तरूणांना ताब्यात घेतलं आहे. तसंच त्यांच्या एका साथीदाराला देखील पोलिसांनी अटक केली आहे.
पुण्यातील एनडीए रस्त्यावर उत्तमनगर परिसरामध्ये आर.आर.वाईन्स मद्य विक्रीचं दुकान आहे. तर रविवारी (19 नोव्हेंबर) रात्री वर्ल्ड कपचा अंतिम सामना सुरू होता. त्यामुळे मद्य विक्री दुकानात मोठी गर्दी होती. त्यावेळी अचानक दुचाकीवरून पाच तरूण आले अन् त्यांनी पिस्तूल, कोयता, तलवारीचा धाक दाखवत दुकानातील रोकड काढून घेतली. तसंच दुकानातील मद्याच्या बाटल्या देखील पिशवीत भरल्या आणि दुकानातील कामगारांना जीवे मारण्याची धमकी देत आरोपी तरूण तिथून पसार झाले.
या घटनेनंतर आरोपींचा शोध घेण्यासाठी सिंहगड रस्ता, उत्तमनगर पोलिसांचे पथक तयार करण्यात आले होते. तर तांत्रिक तपासावरून पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलं. सहायक पोलीस आयुक्त भीमराव टेळे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तमनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर, समीर पवार, दादाराजे पवार, तुषार केंद्रे आदींनी ही कामगिरी केली आहे.
पोलिसांनी आरोपींकडून तलवार, पिस्तूल आणि 32 हजारांची रोकड जप्त केली आहे. तर तेजस राहुल पिंपळगावकर (वय 19) असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. तसंच अन्य चार अल्पवयीन तरूणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या आरोपी मुलांवर यापूर्वीही गुन्हे दाखल झाले आहेत. याबाबतची तक्रार मनोज बाळासाहेब मोरे (वय 33) यांनी दाखल केली होती.