विद्यार्थ्यांनी बनविले भविष्यातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज रोबोट
कचरा विलगीकरण करणारे रोबोट, भूकंपग्रस्त भागात शोध घेणारा रोबोट, आग विझवण्यास सज्ज असलेला अग्निशमन रोबोट, कल्पकतेने कोडे सोडवणारा रोबोट अशा भविष्यातील तंत्रज्ञानाची झलक रोबोटेक्स इंडिया चॅम्पियनशिपमध्ये पाहायला मिळाली. या स्पर्धेत महाराष्ट्रासह विविध राज्यातील तांत्रिकदृष्ट्या कुशल शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी त्यांच्या रोबोटिक्स, एआय प्रोटोटाइपची झलक दाखवली.
रोबोटिक्स इंडिया चॅम्पियनशिप या दरवर्षी होणाऱ्या स्पर्धेचे यंदा पुण्याजवळील लोणी येथील एमआयटी शैक्षणिक संकुल मध्ये आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांपासून ते विविध राज्यांमधील राष्ट्रीय स्तरावरील विद्यार्थ्यांपर्यंत सुमारे दोन हजार विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. लाईन फॉलोवर, ऑर्डीनोड, पझल सॉल्व्हर, रोबो सुमो, फायर फायटर, उद्योजकता अशा विविध प्रकारांमध्ये या महोत्सवामध्ये स्पर्धा रंगल्या. यामध्ये विशेषतः प्राथमिक आणि माध्यमिक शाळातील विद्यार्थ्यांच्या कौशल्याची चुणूक पाहायला मिळाली.
हेही वाचा- पुण्यातील खड्डे उठले नागरिकांच्या जिवावर! अनेक जण गंभीर जखमी
रोबोटिक्स इंडियाच्या संचालिका पायल राजपाल म्हणाल्या, या स्पर्धेमध्ये साठ टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थी हे सरकारी शाळांमधील आहेत. या विद्यार्थ्यांना चांगल्या शैक्षणिक सुविधा बरोबरच तांत्रिक आणि वैज्ञानिक माहिती मिळावी आणि त्यांच्यातील तंत्रज्ञान अधिक वाढीस लागावे यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. गेल्या वर्षी या स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या नऊ जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे कौशल्य दाखविण्याची संधी मिळाली होती. या स्पर्धेतील विजेते विद्यार्थी हे डिसेंबरमध्ये युरोपमधील एस्टोनिया या देशांमध्ये होणाऱ्या रोबोटिक्स वर्ल्ड या ऑलम्पिक दर्जाच्या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत.
यावेळी एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या कुलपती, कार्यकारी संचालक सुनीता व्यंकट, स्टर्लिंग टेक्नॉलॉजीज लिमिटेड ग्रुपच्या मुख्य मानव संसाधन अधिकारी अंजली बायस, फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे ॲनालिटिक्स आणि बिझनेस इंटेलिजन्सचे महाव्यवस्थापक पुष्पेंद्र कुमार, आयटी गव्हर्नन्स रिस्क, ZS इंडियाचे संचालक अली खान, फिक्की फ्लो पुणे चॅप्टर चेअर पिंकी राजपाल, आयसीटी आणि प्रशिक्षण विभाग CIET आणि राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदचे डॉ प्रवीण बी बिंझा, मेकॅनिकल अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स सीओईपी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी पुणे येथील उत्कृष्टतेचे केंद्र प्रमुख डॉ. शांतीपाल ओहोळ, कॉर्पोरेट रिस्पॉन्सिबिलिटीच्या प्रीती बी, ग्लोबंट कंपनीच्या लीडर एचआर आणि सीएसआर प्रमुख मृण्मयी कोष्टी उपस्थित होत्या.
हेही वाचा- पिंपरी चिंचवड पोलीस भरतीसाठी लेखी परीक्षा सुरळीत
या स्पर्धेचे प्रायोजक असणाऱ्या स्टारलाईट टेक्नॉलॉजीच्या ग्रुप ह्यूमन रिसोर्स अधिकारी अंजली बायस म्हणाल्या, या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक गुण तपासणे आणि त्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळवून देणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. छत्रपती संभाजीनगर आणि सिल्वासा येथे असणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये आम्ही यापूर्वी अशा प्रकारे प्रयोग केले आहेत. त्यामुळेच तेथील काही विद्यार्थी हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील रोबोटिक स्पर्धांमध्ये भारताचे नाव उज्वल करत आहे.
फिक्की फ्लो संस्थेच्या पुणे च्या प्रमुख पिंकी राजपाल म्हणाल्या की या स्पर्धेमध्ये देशाच्या विविध भागातील 2000 हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले आहे. याचा आम्हाला निश्चितच आनंद आहे. हेच विद्यार्थी उद्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये भारताचे नाव मोठे करणार आहेत.
हेही वाचा- पिंपरी चिंचवडमध्ये डेंग्यू, झिकाचे थैमान
जेनेसिस असोसिएट्स इंडिया चे अली खान म्हणाले, चार वर्षांपासून आम्ही या स्पर्धेची निगडित आहोत, चार वर्षांमध्ये बाराशे विद्यार्थ्यांना कंपनीच्या माध्यमातून आम्ही सहकार्य केले आहे. यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांना वैज्ञानिक क्षेत्रामध्ये संधी उपलब्ध करून देणे यासाठी आम्ही मुख्यतः कार्य करीत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर व्यासपीठ मिळत आहे ही निश्चितच गौरव असतात बाब आहे.
इलेक्ट्रॉनिक्स सेक्टर स्किल्स कौन्सिल ऑफ इंडिया चे व्हाईस प्रेसिडेंट सरोज कुमार आपतो म्हणाले, अशा प्रकारच्या स्पर्धांमधून सहभागी झाल्यामुळे विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक गुण निश्चितच वाढीला लागतात यामुळेच आम्ही प्रादेशिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर रोबोटिक्स इंडिया चॅम्पियनशिप सारख्या स्पर्धा आयोजित करत आहोत. या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे कलागुण दाखवण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे एक प्रकारे ऑलिंपिकच्या धर्तीवर विद्यार्थ्यांना यामध्ये आपले वैज्ञानिक कुशलचा दाखवता येणार आहे.
डब्ल्यूएनएस कंपनीचे प्रकाश कुमार दास म्हणाले रोबोटिक्स इंडिया चॅम्पियनशिप स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांना वैज्ञानिक क्षेत्रामध्ये कशाप्रकारे विविध संधी उपलब्ध करून देता येतील यासाठी प्रयत्न करीत आहोत. आत्तापर्यंत डब्ल्यूएनएस कंपनीच्या माध्यमातून साठ लाख विद्यार्थ्यांना संधी मिळाली आहे.