“…त्यामुळे भाजपसोबत गेलेला कोणताही लोकनेता टिकू शकत नाही”, रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं
मुंबई | Rohit Pawar – उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात झालेल्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीनंतर अनेक नेत्यांनी शंका उपस्थित केल्या आहेत. यामध्ये महाविकास आघाडीतील काही नेत्यांनीही या भेटीबाबत शंका उपस्थित केल्या आहेत. तर याबाबत आता आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘मुंबई तक’शी बोलताना रोहित पवार म्हणाले की, शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीबाबत महाविकास आघाडीतील नेत्यांनी केलेलं वक्तव्य ते दुरूस्त करतील. तसंच जर शंका असेल तर ते बोलतात, हीच तर महाविकास आघाडीची खासियत आहे. जे काही असेल ते महाविकास आघाडीमध्ये उघड बोललं जातं. भाजपसारखं जवळ बोलवून दुसऱ्या पक्षाला संपवलं जात नाही.
भाजपसोबत आमच्यातील लोकनेते अजित पवार गेले आहेत. पण भाजपसोबत गेलेल्या लोकनेत्यांना संपवलं जातं. यामध्ये भाजपनं एकनाथ खडसे, गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या लोकनेत्यांना संपवण्याचं काम केलं आहे. म्हणूनच भाजपसोबत कोणताही लोकनेता गेला तरी तो टिकू शकत नाही. तसंच आमच्या कुटुंबातील एक व्यक्ती भाजपसोबत गेल्यानं वाईट तर वाटतंच पण भीतीही वाटते, असंही रोहित पवार म्हणाले.