रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेचा ‘संघर्ष’ पेटला! मोर्चा विधानभवनावर धडकताच लाठीचार्ज, नेते ताब्यात, कार्यकर्तेही आक्रमक
नागपूर : (Rohit Pawar Nagpur Lathicharge) नागपुरात पोहोचलेल्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. आपल्या मागण्यांसाठी विधानसभेवर धडकणाऱ्या या यात्रेला पोलिसांनी अडवले असून त्यांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांच्या लाठीचार्जनंतर राष्ट्रवादीचे युवक कार्यकर्तेही आक्रमक झाले असून त्यांनीही पोलिसांचे बॅरिकेटस् तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेच्या सांगता समारंभानंतर मोठा राडा पाहायला मिळाला. रोहित पवार यांनी राज्य सरकारकडे काही मागण्या केल्या आहेत. या मागण्या स्वीकारण्यासाठी राज्य सरकारचे जबाबदार व्यक्ती हजर नसल्याने, रोहित पवार आणि युवक राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. जर कोणी जबाबदार व्यक्ती निवेदन स्वीकारण्यास येणार नसेल तर आम्ही विधानभवनात जाऊन निवेदन देऊ, असं रोहित पवार म्हणाले होते.
युवा संघर्ष यात्रेच्या सांगता समारंभात रोहित पवार यांनी आपल्या भाषणावेळी हे सांगितलं होतं. त्यानंतरही रोहित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं निवेदन स्वीकारण्यास कोणी न आल्याने, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विधानभवानकडे कूच केली. या कार्यकर्त्यांनी बॅरिकेट्स तोडून प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांच्या या आक्रमक पवित्र्यानंतर पोलिसांनी काही प्रमाणात लाठीचार्ज केला.
रोहित पवार काय म्हणाले?
राज्यात युवकांचे प्रश्न आहेत, आरोग्य यंत्रणा खिळखिळी झाली आहे. MPSC परीक्षेसंदर्भात प्रश्न आहेत, शिष्यवृत्तीचा मुद्दा आहे, हे सर्व मुद्दे घेऊन आम्ही निघालो आहोत. पण या मुद्द्यांची दखल घेण्यासाठी, निवेदन स्वीकारण्यासाठी कोणी जबाबदार व्यक्ती नाही, त्यामुळे आम्ही हे निवेदन घेऊन जात आहोत, असं रोहित पवार म्हणाले.
रोहित पवार पोलिसांच्या ताब्यात
या सर्व राडेबाजीनंतर पोलिसांनी रोहित पवार यांना ताब्यात घेतलं. रोहित पवारांना ताब्यात घेतल्यानंतर राष्ट्रवादी आणि युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. रोहित पवार यांनी पोलिसांच्या गाडीजवळ ठिय्या मांडला. कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे परिसरात एकच गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं.