मुंबई | Rohit Pawar On Shinde Government – सध्या राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. शिंदे गट विरूद्ध ठाकरे गट असा संघर्ष सुरू असून दोन्ही गटाचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. दसरा मेळाव्यानंतर आता ठाण्यातील दिवाळी पहाट कार्यक्रमावरून पुन्हा शिंदे गट विरूद्ध ठाकरे गट असा संघर्ष सुरू होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी शिंदे गटाला (Shinde Group) टोला लगावला आहे.
“दसरा मेळाव्याच्या वेळीही शिंदे गटानं शिवाजी पार्क मैदानासाठी हट्ट धरला होता. त्यावेळी त्यांनी मोठ्या मनानं उद्धव ठाकरेंना दसरा मेळावा घेऊ द्यायला हवा होता. मात्र हे प्रकरण न्यायालयात गेलं. अंधेरी निवडणुकीच्या उमेदवारीवरूनही त्यांनी हाच प्रकार केला. अखेर न्यायालयानं ठाकरे गटाच्या बाजुने निकाल दिल्यानंतर ऋतुजा लटकेंचा राजीनामा मंजूर करण्यात आला. तसंच आता दिवाळी पहाट कार्यक्रमासाठीही न्यायालयात जावं लागेल की काय, अशी परिस्थिती आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी जर न्यायालयात जावं लागत असेल तर जनता निवडणुकीच्या माध्यमातून त्यांना उत्तर देईल. मोठ्या मनाचे लोक निवडून येतील आणि सारखं आडवाआडवीचे कामं करणाऱ्यांचा पराभव होईल”, असा खोचक टोला रोहित पवार यांनी शिंदे सरकारला लगावला आहे.
दरम्यान, रोहित पवार यांनी राज्य सरकारनं 830 कोटींच्या प्रकल्पांना स्थगिती दिल्यावरूनही शिंदे सरकारवर टीका केली. “राज्य सरकारने ज्या प्रकल्पांना स्थगिती दिली आहे. त्यापैकी बरेच प्रकल्प हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या मतदार संघातले आहे. यामध्ये रस्ते, शाळा, मंदिरे यासारख्या कामांचा समावेश आहे. या कामांसाठी जर हे पैसे खर्च झाले असते, तर सर्वसामान्यांची अनेक महत्त्वाची कामे पूर्ण झाली असती. त्यामुळे सरकारचा हा निर्णय योग्य नाही”, असंही ते म्हणाले.