शिंदे गटाच्या नेत्याने सांगितली ‘त्या’ दोन नेत्यांची नावं, बारामती ॲग्रो प्रकरणी रोहित पवारांचा गौप्यस्फोट
बारामती | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या बारामती अॅग्रो कंपनीतील (Baramati Agro Ltd) दोन प्लांट बंद करण्याची नोटीस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) बजावली होती. ही कारवाई 2 नेत्यांच्या सांगण्यावरून झाली, असा आरोप रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला होता. अशातच शिंदे गटाच्याच एका नेत्याने माहिती दिल्याचा गौप्यस्फोट रोहित पवारांनी केला आहे. त्या दोन नेत्यांचे नावं लवकरच जाहीर करणार असं त्यांनी सांगितलं आहे.
निवडणूक आयोग भाजपच्या हातातील बाहुले…
राष्ट्रवादी पक्ष, चिन्ह यासंदर्भात आज निवडणूक आयोगाकडून होणाऱ्या सुनावणीबाबत रोहित पवारांनी भाजपवर निशाणा साधलाय. संविधानाला मनामध्ये ठेवून जर निर्णय झाला तर शरद पवारांच्या बाजूने निकाल लागेल, मात्र संविधानाला धरून निर्णय झाला नाही तर भाजपच्या बाजूने निकाल लागेल असं मत रोहित पवारांनी व्यक्त केलं. मात्र आता सामान्य लोकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे की निवडणूक आयोग ही भाजपच्या हातातली बाहुली आहे अशी टीका रोहित पवारांनी केली. तसेच जेव्हा शिवसेना फुटली आणि शिंदे गटाच्या बाजूने उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अन्यायकारक निर्णय दिला, तसाच निर्णय आज दिला निवडणूक आयोग भाजपच्या हातातील बाहुले आहे हे सिध्द होईल असं रोहित पवार म्हणाले.