माता वैष्णोदेवी मंदिरापर्यंतच्या प्रस्तावित रोप वेला विरोध; दुकानदार, पालखी मालकांचे आंदोलन
जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यातील त्रिकुट पर्वतावर असलेल्या ‘वैष्णोदेवी’ मंदिरापर्यंतच्या प्रवासाच्या मार्गावर प्रस्तावित रोपवे प्रकल्पाला विरोध सुरू आहे. सोमवारी उग्र आंदोलकांनी पोलिसांवर हल्ला केला. या घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
तारकोट मार्ग ते सांझी छत या १२ किमी लांबीच्या मार्गावर २५० कोटी रुपये खर्चाचा प्रवासी रोपवे प्रकल्प राबविण्याच्या श्री माता वैष्णोदेवी श्राइन बोर्डाच्या घोषणेनंतर दुकानदार, पोनी आणि पालखी मालकांकडून सातत्याने आंदोलने सुरू आहेत.श्री माता वैष्णो देवी श्राइन बोर्डने यात्रेकरूंचा प्रवास सोयीस्कर आणि जलद होण्यासाठी बहुप्रतिक्षित रोपवे प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला होता.
बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंशुल गर्ग म्हणाले होते, रोपवे प्रकल्प एक परिवर्तनकारी प्रकल्प असेल, विशेषत: ज्या यात्रेकरूंना मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी १३ किमी उंच उतार चढणे आव्हानात्मक वाटत असेल त्यांच्यासाठी तो अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
रोपवेचा विशेषत: वृद्ध यात्रेकरूंना फायदा होईल आणि जे शारीरिक कमतरतेमुळे किंवा हेलिकॉप्टर सेवेच्या मर्यादित क्षमतेमुळे कठीण प्रवास पूर्ण करू शकत नाहीत त्यांनाही याचा लाभ होईल. शिवाय प्रकल्पाच्या अंमलबजावणीदरम्यान स्थानिक भागधारकांच्या चिंतांचाही विचार केला जाईल यावर बोर्डाने जोर दिला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, निर्णय झाल्यानंतर लवकरच काम सुरू करण्याचे बोर्डाचे उद्दिष्ट आहे.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रोपवे तारकोट मार्गाला मुख्य तीर्थक्षेत्र इमारतीशी जोडेल. पर्यावरणावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी काळजीपूर्वक नियोजन करण्यात आले आहे, ज्यामुळे भाविकांना त्रिकुटा टेकड्यांचे नेत्रदीपक दर्शन मिळेल आणि आध्यात्मिक आणि निसर्गरम्य अनुभवाची भर पडेल.