चांद्रयान-2 अयशस्वी होण्याचं कारण…; इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांच्या दाव्यामुळे खळबळ
नवी दिल्ली– (S. Somnath On Chandrayan-2) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी केलेल्या एका दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. इस्रोचे माजी अध्यक्ष के. सिवन यांनी त्यांना इस्रोच्या अध्यक्षपदापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला असा दावा एस सोमनाथ यांनी केलाय. मनोरमा या दक्षिण भारतातील माध्यमाने एस सोमनाथ यांच्या पुस्तकातील माहितीच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे.
सोमनाथ यांनी आपली आत्मकथा ‘निलावु कुदिचा सिम्हांगल’ या पुस्तकात लिहिली आहे. यामधून त्यांनी अनेक खळबळजनक दावे केले आहेत. पुस्तकात त्यांनी म्हटलंय की चांद्रयान- २ मोहीम अयशस्वी ठरली कारण ते घाईगडबडीत लॉन्च करण्यात आले होते. चांद्रयान-२ च्या सॉफ्टवेअरमध्ये एक त्रुटी राहिली होती. त्यामुळे मोहीम अयशस्वी ठरली.
के. सिवन २०१८ मध्ये इस्राचे अध्यक्ष झाल्यानंतही ते विक्रम साराभाई अंतराळ कंद्राचे (वीएसएससी) निर्देशक म्हणून काम पाहात होते. एस सोमनाथ यांनी हे पद जेव्हा मागितला तेव्हा त्यांना सिवन यांनी काहीही उत्तर दिलं नाही. इस्रोचे तीन वर्ष अध्यक्ष राहिल्यानंतरही के सिवन यांनी आपला कार्यकाळ वाढवून घेण्याचा प्रयत्न केला. मी अध्यक्ष होऊ नये यासाठी त्यांनी प्रयत्न केले, असं सोमनाथ पुस्तकात म्हणालेत.
चांद्रयान-२ चंद्रावर उतरणार होते तेव्हा पंतप्रधान मोदी इस्रोमध्ये आले होते. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी आलेल्या समूहापासूनही त्यांना दूर ठेवण्यात आले होते. के सिवन यांनी चांद्रयान-२ मध्ये अनेक बदल केले होते. शिवाय मोठ्या प्रमाणात प्रचार-प्रसार केला होता. त्याचा प्रतिकूल परिणाम मोहीमेवर पडला, असंही सोमनाथ म्हणालेत.