भारत मालिका वाचवणार? जोहान्सबर्गचे हवामान खेळ बिघडवणार की, कोणाला पावणार..
SA vs IND 3rd T20I Pitch Report : दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या दोन्ही टी 20 सामन्यात पावसाने व्यत्यय आणला. पहिला सामना तर टॉस न होताच रद्द झाला. तर दुसऱ्या सामन्यात पाऊस दक्षिण आफ्रिकेला पावला.
मालिकेतील दुसरा सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेने मालिकेत 1 – 0 अशी आघाडी घेतली आहे. याचबरोबर भारताची सलग तीन मालिका विजयाची मालिका देखील खंडीत झाली आहे. कारण जरी तिसरा सामना भारताने जिंकला तरी मालिका बरोबरीत सुटणार आहे.
दरम्यान, जोहान्सबर्गच्या वाँडरर्सवर तिसरा सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्यातील खेळपट्टी कशी असले. त्याचा भारताला फायदा होईल की दक्षिण आफ्रिकेला. वाँडरर्सचा टी20 मधील ट्रॅक रेकॉर्ड कसा आहे याबाबत सर्वांच्या मनात उत्सुकता आहे.
कशी असते वाँडरर्सची खेळपट्टी?
गुरूवारी दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील तिसरा आणि शेवटचा टी 20 सामना होणार आहे. दक्षिण आफ्रिकेला मालिका जिंकण्याची संधी आहे तर भारत मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी प्रयत्नशील असेल. वाँडरर्सची खेळपट्टी ही सहसा फलंदाजांना साथ देणार असते. इथं फलंदाज चांगल्या धावा करू शकतात.
त्यामुळे तिसऱ्या टी 20 सामन्यात धावांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र जर हवामान ढगाळ असेल तर तेथे वेगवान गोलंदाजांना साथ मिळते. 14 डिसेंबरला जोहान्सबर्गचं हवामान हे अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाजांसाठी ही आनंदाची बातमी आहे.