भुजबळ दोन समाजात भांडण लावताहेत, त्यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा; संभाजीराजेंचा हल्लाबोल
मुंबई : (Sambhaji Chhatrapati On Chhagan Bhujbal) छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी जालना येथील ओबीसी मेळाव्यात केलेल्या वक्तव्यावरून आता राज्यातील वातावरण तापण्याची चिन्हं आहेत. भुजबळांच्या वक्तव्यावर छत्रपती संभाजीराजे (Sambhaji Chhatrapati) यांनी टीकास्त्र सोडले असून स्वतःचे राजकीय स्थान टिकवण्यासाठी भुजबळ हे दोन समाजांत भांडणं लावण्याचे पाप करत आहेत असा आरोप त्यांनी केला.
राज्य सरकारमधील एक मंत्री अशी भूमिका घेत आहे याला राज्य सरकार सहमत आहे का, असा खडा सवाल देखील संभाजीराजे यांनी उपस्थित केला असून छगन भुजबळ यांची मंत्री पदावरून हकालपट्टी करावी, अशीदेखील मागणी त्यांनी केली आहे.
छगन भुजबळ हे राज्याचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे काम करत आहेत. सर्वसामान्य ओबीसी बांधवांचा मराठा समाजास कोणताही विरोध नसताना केवळ आपले राजकीय स्थान टिकवण्यासाठी दोन समाजांत नसलेली भांडणं लावण्याचं पाप करत आहेत. सरकारमधील एक मंत्री उघडपणे वेगळी भूमिका घेऊन जातीय तेढ निर्माण करत असेल तर सरकारची देखील हीच भूमिका आहे का? हे स्पष्ट करावे अन्यथा छगन भुजबळ यांची मंत्री पदावरून हकालपट्टी करावी.