तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्तेमध्ये… संभाजी राजेंची मोदींकडे ही मागणी
छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर की, स्वराज्य रक्षक यावरून गेला महिनाभर वाद सुरू आहे. या संदर्भात स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार संभाजी राजे यांना माध्यमांनी विचारले असता, “आता आपण त्याच्यापलीकडे जाण्याची गरज आहे. या काही जुन्या पदव्या नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूळ उपाध्या वेगळ्या आहेत,” असे संभाजी राजे म्हणाले.
पुढे ते म्हणतात, छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यवीर, स्वातंत्र्यवीर आणि धर्मवीर असल्याचे आजवर मी केलेल्या ऐतिहासिक भाषणात सांगितले आहे. त्यावेळी कोणाला लक्षात आले नाही. पण आता धर्मवीर शब्दावरून वेगवेगळे राजकीय पक्ष राजकारण करत आहेत, अशी भूमिका संभाजी राजे यांनी मांडली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील स्मारकाबाबत राज्य आणि केंद्र सरकारकडून कोणतीही भूमिका घेत नसल्याचे दिसत आहे. त्यावर संभाजी राजे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या जलपूजन कार्यक्रमास गेलो होतो. पण आता त्यावर कोणीही बोलण्यास तयार नाही. तसेच आता राज्य सरकारने त्यांच्या हातात ज्या काही गोष्टी आहेत किमान त्या तरी त्यांनी करण्याची गरज आहे. ती म्हणजे गड किल्ल्यांचे संवर्धन केले पाहिजे. त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला पाहिजे. संभाजीराजे पुढे म्हणाले की, “आपल्या राज्यात समुद्राच्या किनाऱ्यावर सर्वाधिक किल्ले आहेत. त्याबाबतचा प्लान माझ्याकडे आहे. त्यावर मी बोलून थकलो असून त्याची कोणीही दखल घेत नाही. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्तेमध्ये आला आहात ना, तर राज्यातील गड किल्ले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे,” अशी मागणी संभाजी राजे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केली आहे.