“…मग श्रीकांत शिंदे हे कोणता चमचा घेऊन जन्माला आला”; ठाकरेंच्या वाघाने शिंदेंची कुंडलीच काढली..
मुंबई : (Sanjay Ghadigaonkar On Naresh Maske) शिवसेनेच्या वतीने ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर घराणेशाहीचा आरोप करण्यात येतो. आदित्य हे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, असा आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला होता. यानंतर ठाकरे गटानेही जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे. आदित्य ठाकरेंवर खालच्या पातळीवर टीका करता, मग खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे कोणता चमचा घेऊन जन्माला आले ते जाहीर करा, असा सडेतोड प्रश्न ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगावकर यांनी नरेश म्हस्केंना केला आहे. शिवसेनेचे दोन्ही गट घराणेशाहीवरून एकमेकांसमोर ठाकल्याने ठाण्यातील वातावरण तंग झाले आहे.
संजय घाडीगावकर यांनी सोशल मीडियावरून मस्के यांच्यावर निशाणा साधला आहे. घाडीगावकर म्हणाले, ‘अहो आंतरराष्ट्रीय नेते नरेश म्हस्के बाळासाहेबांनी शिवसेना उभी केली. उद्धव ठाकरे यांनी ती वाढवली. त्यामुळे एखादे पद घेण्याचा ठाकरे कुटुंबाचा नैतिक अधिकार आहे, तर तुमच्या पोटात का दुखते?,’ असाही सवाल त्यांनी केला आहे.
ते म्हणाले, ‘तुम्ही (Aditya Thackeray) आदित्य ठाकरेंवर बोलताना सोन्याचा चमचा घेऊन आलात आणि कॅबिनेट मंत्री झाला, असे म्हणता. मग म्हस्के तुमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मुलगा कोणता चमचा घेऊन आला? की त्याला गोपाळ लांडगे यांच्यासारख्या ज्येष्ठ शिवसैनिकांचे तिकीट कापून दोन वेळा खासदार केले. आदित्य हे बाळासाहेबांच्या काळात शिवसेनेचे नेते होते. श्रीकांत शिंदे कुठे शिवसैनिक होते?’ अशी चहुबाजूने घाडीगावकरांनी मस्के यांचा समाचार घेतला.
महापौर कसे झालात, हे स्पष्ट करून घाडीगावकरांनी मस्केंची कोंडी केली. ते म्हणाले, ‘तुम्ही आदित्य ठाकरेंना दोन आमदारांना डावलून थेट आमदार झाला म्हणता, मग संजय भोईर यांना डावलून तुम्ही महापौर का झालात? तुम्ही निवडणूक न लढता पहिल्यांदा मागच्या दाराने स्वीकृत नगरसेवक का झालात? तेव्हा तुम्हाला एखाद्या गट प्रमुखाला नगरसेवक करावेसे का वाटले नाही?,’ असे अनेक प्रश्न उपस्थित करून मस्केंवर सडकून टीका केली.
‘तुम्हाला सर्वांना निवडून आणण्यासाठी जिवाचे रान करून सभा घेतल्या, त्या आदित्या ठाकरेंना तुम्ही आदूबाळ म्हणून हिणवताना तुम्हाला लाज वाटत नाही का? तुम्हाला लाज वाटेल कशी? गद्दारीपासून तुमची बुद्धी अदू झाली आहे. तुम्ही भाजपने दिलेल्या स्क्रिप्ट वाचत राहा. ठाकरे कुटुंबावर केलेल्या प्रत्येक टीकेचे उत्तर जनता तुम्हाला निवडणुकीत देईल,’ अशी खरमरीत टीका घाडीगावकर यांनी म्हस्के यांच्यावर केली.