संजयने धृतराष्ट्राला ’आंधळा’ केला

उद्धव ठाकरे यांना जर आता ही परिस्थिती सावरायची असेल तर जनतेला कौल मागावा लागेल, तोपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. पण किमान तोपर्यंत त्यांनी संजयकडून बांधली गेलेली डोळ्यावरची पट्टी काढून टाकावी आणि डोळसपणे सेनेच्या भवितव्याकडे आणि महाराष्ट्राच्या मराठी हिताकडे पाहावे.
महाभारतातील धृतराष्ट्र मुळातच आंधळा होता. संजयच्या दृष्टीने त्याने रणसंग्राम पाहिला. पण कलियुगातील डोळस धृतराष्ट्राला ‘संजयने आंधळे केले.’ केवळ आंधळेच नाही तर आज लुळे-पांगळे केले, असहाय केले, अगतिक केले. या आंधळेपणाला बहिरेपणाचीही बाधा झाल्याचे दिसले. कारण या संजयच्याविरोधात, ‘बलशाली मंत्र्यांपासून ते सामान्य शिवसैनिकां’पर्यंत चाललेल्या किंकाळ्यादेखील या धृतराष्ट्राला ऐकू येईनात. या सगळ्या विध्वंसात सेनेचे जे काही नुकसान झाले त्याला बहुतांशी जबाबदार हे संजय राऊत ही व्यक्ती, त्यांची प्रवृत्ती, त्यांचा अहंकार आहे, हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे. काल या महाराष्ट्राचे ऐतिहासिक मुख्यमंत्रिपद जात असल्याची जाणीव झाल्यानंतरदेखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे शेवटचे लाईव्ह विवेचन केले.
त्यातही त्यांचा सूर बिघडलेला दिसला.’ मुख्यमंत्री म्हणून मला माझ्याच लोकांचा विरोध आहे…’ हा त्यांचा सूर शंभर टक्के ‘संजय राऊत यांच्या कानभरणीमुळेच’ बिघडलेला होता, कारण उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाबद्दल कुणालाही हरकत नाही. ज्याने बंड केले त्या एकनाथ शिंदे यांनाही हरकत नाही. फक्त कुणाचेही चालू दिले जात नाही आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचू दिले जात नाही, हा त्यांचा आक्षेप आहे. तोच आक्षेप शिवसेना आमदारांचादेखील आहे. त्यामुळे नेहमी जो मुद्दाच नाही तो त्यांच्यापर्यंत पोहोचवला जातो आणि त्याला प्रतिक्रिया म्हणून उद्धव ठाकरे जे बोलतात ते ती कधीच संयुक्तिक ठरत नाही, ते औचित्यपूर्ण नसते आणि हीच त्यांची बिघडलेली लय आज त्यांच्या पदावरील अखेरच्या लाईव्हपर्यंतदेखील कायम राहिली. महाराष्ट्र सध्या जो राजकीय रणसंग्राम अनुभवत आहे, तो शिवसेनेसाठी दुर्दैवी आणि कदाचित पुन्हा कधीही न भरून येणार्या पोकळीचा आरंभ असणारा आहे. यापूर्वीदेखील शिवसेनेमध्ये छगन भुजबळ, नारायण राणे, गणेश नाईक यांनी बंड केले. परंतु बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीमधले ते बंड मोडून काढणे बाळासाहेबांच्या करिष्म्यासमोर शक्य झाले होते. आज ते उद्धव ठाकरे यांच्या वकुबाच्या बाहेर गेले आहे हे स्पष्ट आहे.
आजदेखील जनतेशी संवाद साधत असताना त्यांचा सूर पराभूत मानसिकतेचा आणि निर्वाणीच्या अगतिकतेचा होता, हे दिसून आले. ही परिस्थिती एका रात्रीत निर्माण झालेली नाही. याची कल्पना अनेकदा सामान्य शिवसैनिकांपासून ते सेनेचे आमदार, खासदार, मंत्रिमंडळातील काही सहकारी यांनी वेळोवेळी दिलेली आहे… परंतु आंधळ्या राजालाही काहीच दिसेना. केवळ मिलिंद नार्वेकर, संजय राऊत, आदित्य ठाकरे हाच त्यांचा राजेशाही दरबार आणि सल्लागाराची चौकट. त्याच्या पलीकडे उद्धव ठाकरे काही पाहतच नव्हते. दुर्दैवाने हेच त्यांच्या मुळावर आले. काल त्यांनी भाषणात सांगत असताना ‘कुर्हाडीचा दांडा गोतास काळ’ हे एकनाथ शिंदेबद्दलचे वाक्य उच्चारले. परंतु खरे तर हे त्यांच्याबद्दलचेदेखील वास्तव आहे. संजय राऊत आणि त्यांचा कंपू हाच शिवसेनेच्या विनाशाला कारणीभूत ठरणारा आहे. या सगळ्या प्रकाराला कदाचित शिवसेनेकडून देवेंद्र फडणवीस यांना खलनायक ठरवले जाईल, एकनाथ शिंदे यांना ठरवले जाईल, बंडखोरांना गद्दार’ उपमा दिली जाईल, परंतु हे सारे घडले, का घडले? याचा कधीतरी उद्धव ठाकरे विचार करतील आणि तो विचार करत असताना संजय राऊत यांचा चष्मा बाजूला ठेवून ते या सगळ्या प्रकाराकडे पाहतील तेव्हा त्यांची चूक त्यांना उमजल्याशिवाय राहणार नाही. शेवटी हे राजकारण आहे, धर्मकारण नाही. येथे संधी मिळत असेल तर देवेंद्र फडणवीससारखे विरोधी पक्षनेते ती साधणार आणि सत्तेच्या सिंहासनावर आरूढ होणार.
अडीच वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी हेच केले. वैचारिकता न जुळणार्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत घरोबा करून सत्तासंपत्तीसाठी त्यांनी हिंदुत्वाला एक प्रकारे तिलांजली दिली. त्यामुळे राजकारणात हे चालतेच… फक्त शिवसेनेसारख्या एका प्रगल्भ मराठीप्रेमी, हिंदुत्वप्रेमी पक्षाची अशी वाताहत होणे हे मराठी माणसालादेखील सहन होण्यासारखे नाही. विरोधी म्हणून का असेना पण शिवसेनेसारख्या हिंदुत्वाचा पुरस्कार करणारा पक्ष महाराष्ट्रीय मराठी माणसाला हवा आहे. प्रजेतून राजा उठला किंवा बाजूला पडला की काय अवस्था होते हे राष्ट्रीयपातळीवर काँग्रेसने असे दाखवून दिले. तसेच प्रादेशिक पातळीवर शिवसेनेने दाखवून दिले… हे उदाहरण आता देशभर चर्चिले जाईल.
सल्लागार कसे नसावेत, याची मीमांसा मांडत असतानादेखील शिवसेनेचे आणि संजय राऊत यांचे उदाहरणे पुढे येतील. उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व स्वीकारण्यासाठी खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनी साद घातली होती, तो त्यांचा वकूब होता, आवाका होता, दरारा होता. आज उद्धव ठाकरे इतक्या बॅकफूटवर गेले असताना त्यांचे वय आणि शारीरिक क्षमता पाहता ते आदित्य ठाकरेकरितादेखील आता इतकी मोठी स्पेस निर्माण करू शकणार नाहीत. त्यासाठी साद घालू शकणार नाहीत. हा खर्या अर्थाने शिवसेनेचा आणि ठाकरे घराण्याचा पराजय आहे. उद्धव ठाकरे यांना जर आता ही परिस्थिती सावरायची असेल तर जनतेला कौल मागावा लागेल, तोपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. पण किमान तोपर्यंत त्यांनी संजयकडून बांधली गेलेली डोळ्यावरची पट्टी काढून टाकावी आणि डोळसपणे सेनेच्या भवितव्याकडे आणि महाराष्ट्राच्या मराठी हिताकडे पाहावे.