“नावात काय आहे हे नवं चिन्हच…”, राजकीय सत्तासंघर्षावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई | Sanjay Raut – शनिवारी (8 ऑक्टोबर) केंद्रीय निवडणूक आयोगानं रात्री उशिरा महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या वादावर शिवसेना (Shivsena) पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवल्याचं निर्देश दिले. त्यानंतर रविवारी दिवसभर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. यासंदर्भात आता शिवसेनेचे खासदार आणि सध्या कोठडीमध्ये असलेले संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही इशाऱ्यानेच प्रतिक्रिया दिली आहे.
आज (10 ऑक्टोबर) संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होत आहे. त्यासाठी पोलीस राऊतांना न्यायालयाकडे घेऊन जात होते. त्यावेळी जाता जाता माध्यमांनी त्यांना चिन्ह गोठवण्यात आल्याविषयी प्रतिक्रिया देण्याचा आग्रह केला. त्यावेळी त्यांनी मान हलवून त्यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. पुढे तुम्ही कारागृहात जाताना महाराष्ट्र कमजोर होतोय, असं म्हणाला होता, त्याविषयी विचारलं असता त्यांनी मान हलवून होकार देत आपण खरंच बोललोय, अस इशारा त्यांनी हाताने केला.
संजय राऊतांना न्यायालयात नेताना आजूबाजूला शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. त्यानंतर शिवसैनिकांनी त्यांना चिन्ह गोठवल्याविषयी विचारलं असता राऊतांनी उत्तर दिल्याचं सामच्या सूत्रांनी सांगितलं आहे. यावेळी राऊत म्हणाले, “चिन्ह गेल्याची ही पहिली वेळ नाही. काँग्रेसमध्ये इंदिरा गांधीही अशाच परिस्थितीतून पुढे गेल्या होत्या. तीनवेळा त्यांचं चिन्ह बदललं होतं. जनसंघालाही या परिस्थितीचा सामना करावा लागला. हे काही नवीन नाही. हे नवं चिन्हच शिवसेनेसाठी क्रांती घडवेल. नावात काय आहे? खरी शिवसेना कुणाची हे सगळ्यांना माहित आहे”.