“मी तुरुंगात असतानाही राहुल गांधी माझी चौकशी करायचे” – संजय राऊत
जम्मू: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत जम्मू येथे भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी आले आहेत. यापूर्वी ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे यांनी भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला होता. भाजपला डिवचण्यासाठीच ठाकरे गट भारत जोडो यात्रेत सहभागी होत असल्याची जोरदार चर्चा आहे. संजय राऊत जम्मूत आले असले तरी काल रात्रीपासूनच जम्मूत पावसाला सुरुवात झाली होती. या पावसातही संजय राऊत भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आहेत.
यावेळी माध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, राहुल गांधी स्वेटर का घालत नाहीत हे मी त्यांना विचारलं नाही कारण मी राहुल गांधींना ओळखतो. त्यांची जीवनचर्या मला माहित आहे. मी राहुल गांधींसोबत चाललो त्यावेळी राहुल गांधी यांनी माझी काळजी केली. ते म्हणाले तुम्ही आत्ताच मोठा त्रास सहन करून आला आहात. त्यामुळे जास्त चालू नका. पण मी त्यांच्यासोबत पहिला टप्पा पूर्ण केला.
राहुल गांधी यांनी माझ्याकडे उद्धव ठाकरेंची चौकशी केली
माझ्याकडे राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरेंचीही चौकशी केली. मला का अटक केली हे राहुल गांधी यांना माहित होतं. त्यामुळे त्यांनी माझी त्यासंदर्भातली चौकशी केली आहे. डरो मत हा त्यांचा आणि माझा सामायिक मंत्र आहे. माझ्या घरातल्यांचीही चौकशी राहुल गांधी यांनी केली. मी तुरुंगात असतानाही राहुल गांधी माझी चौकशी करायचे असे ते म्हणाले.