अमित शाहांच्या ‘त्या’ ४ प्रश्नांवर शिवसेनेचं सडेतोड उत्तर; म्हणाले, “…अन् त्याच चक्रव्युहात भाजप अकडले…,”

मुंबई : (Sanjay Raut On Amit Shah) केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी नांदेडमधील सभेत शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. शाहांनी ठाकरेंना चार प्रश्न विचारत त्यावर भूमिका स्पष्ट करण्याचं आव्हान दिलं. यानंतर आता शिवसेनेकडून सडेतोड उत्तर देण्यात आलं आहे.
शिवसेनेकडून खासदार संजय राऊत यांनी अमित शाहांच्या चारही प्रश्नांचे सडेतोड उत्तर दिलं आहे. तसंच महाराष्ट्रातील जनतेचा अमित शाहांपेक्षा अधिक विश्वास ठाकरे कुटुंबावर असल्याचं मत व्यक्त केलं. राऊत म्हणाले, “ट्रिपल तलाकच्या कायद्याला आम्ही पाठिंबा दिला. त्यांना माहिती नसेल तर त्यांच्या लक्षात आणून देऊ. कलम ३७० च्या मुद्द्यावरही आम्ही मोदी सरकारला संसदेत जाहीर पाठिंबा दिला.”
“अमित शाहांनी मुस्लीम आरक्षणाविषयी विचारलं. मात्र, आरक्षणाबाबत आमची भूमिका स्पष्ट आहे. जात-धर्माच्या आधारावर आरक्षण असता कामा नये ही आमची भूमिका आहे. आरक्षण आर्थिक निकषांवर असावं. हीच भूमिका बाळासाहेब ठाकरेंनी मांडली होती. त्यांनी शिवसेनेवर इतिहासाचा अभ्यास करून बोलावं,” असं संजय राऊत यांनी म्हटलं.
“अयोध्येच्या आंदोलनात तर आम्ही सहभागी होतोच. अमित शाह कोणते प्रश्न विचारत आहेत. त्यांचा गोंधळ झाला आहे. अमित शाहांनी शिवसेनेसाठी जे चक्रव्युह निर्माण केलं त्याच चक्रव्युहात अमित शाह आणि भाजप अकडले. मला त्यांचा अभिमन्यु होताना दिसत आहे,” असं म्हणत राऊतांनी शाहांवर हल्लाबोल केला.