ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

भुजबळ-जरांगे यांच्यावर संजय राऊत संतापले; म्हणाले, “१०६ हुतात्म्यांनी यासाठी बलिदान दिलंय का?…”

मुंबई : (Sanjay Raut On Bhujbal vs Jarange) गेल्या काही दिवसांपासून मंत्री छगन भुजबळ आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यावरून शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी छगन भुजबळ आणि मनोज जरांगे-पाटलांना खडसावलं आहे.

“छगन भुजबळ आणि मनोज जरांगे-पाटील एकमेकांना आव्हाने कसली देत आहेत? तुम्ही दिलेलं आव्हान महाराष्ट्राच्या मुळावर येत आहे. सर्वांनी एकत्र बसून मार्ग काढला पाहिजे,” असं आवाहन संजय राऊतांनी केलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, “महाराष्ट्रातील वातावरण खराब झालं आहे. यासाठी महाराष्ट्र स्थापन केला होता का? १०६ हुतात्म्यांनी आजचा दिवस पाहण्यासाठी बलिदान दिलं होत का? हात-पाय तोडण्याची भाषा केली जात आहे. अशाप्रकारे कुणी विष कालवलं नाही. समाज मनाने इतका कधीही दुभंगला नव्हता.”

“भारत-पाकिस्तान फाळणीच्यावेळी अशाप्रकारची भाषा वापरण्यात आली होती. आरक्षण किंवा अन्य प्रकरणांवरून जाती-जातीत भांडणे होत आहेत. रक्त सांडणे, एकमेकांचे हात-पाय तोडण्याची भाषा महाराष्ट्रात कधीही वापरली नाही. तसेच, सरकारचं कुणीही ऐकत नाही,” असंही संजय राऊतांनी सांगितलं.

“सामाजिक दृष्ट्या महाराष्ट्रात दुभंगलेला पाहायला मिळतोय. छगन भुजबळ आणि मनोज जरांगे-पाटील भाषणे आणि आव्हाने कसली देत आहेत? तुम्ही दिलेले आव्हान महाराष्ट्राच्या मुळावर येत आहे. सर्वांनी एकत्र येऊन चर्चा करत मार्ग काढला पाहिजे. भाषणाने तुम्हाला फक्त टाळ्या मिळतील आणि जयजयकार होईल,” असेही संजय राऊतांनी म्हटलं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये