“मुख्यमंत्र्यांच्या तोंडाला रक्त लागलंय, त्यामुळे ते…”, संजय राऊतांचा घणाघात

मुंबई | Sanjay Raut On CM Eknath Shinde – सध्या सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर सुनावणी चालू आहे. त्यामुळे शिंदे गट आणि ठाकरे गटात आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांना आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले. “देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि गिरीश महाजनांच्या (Girish Mahajan) अटकेची चर्चा चालू होती. तेव्हा मी तिथे उपस्थित होतो. त्यामुळे तेव्हा मी काय म्हणालो, हे मी आत्ता सांगणार नाही, नंतर सांगेन”, असं एकनाथ शिंदे म्हणाले होते. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. तर यासंदर्भात संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत म्हणाले की, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खोटं बोलत आहेत. गुवाहाटीला जाऊन आल्यापासून त्यांच्या तोंडाला जे रक्त लागलं आहे त्यामुळे ते खोटं बोलत आहेत. उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा सरकारचं धोरण हे होतं की कुणावरही राजकीय सूडापोटी कारवाया करायच्या नाहीत. त्यामुळे आम्ही ते धोरण पाळलं. नाहीतर अत्यंत संथ गतीनं अनेक तपास झाले नसते. तावून-सुलाखून काढलं नसतं.”
“महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा घोटाळा झाला तो म्हणजे विक्रांत घोटाळा. यावर ठाकरे सरकारनं काळजीपूर्वक तपास करायला सांगितलं. तेव्हा अटक करता आली असती. अनेक प्रकरणं नव्या सरकारनं सत्तेवर येताच दडपून टाकली. क्लीनचिट दिली. फडणवीस, महाजन यांना अटक करण्यासंदर्भात असं कधी काय झालं होतं का? याचा अर्थ असा होतो की सध्याचे मुख्यमंत्री त्या गुन्ह्यात सहभागी होते. तेव्हा ते तोंड आवळून का बसले होते? उद्धव ठाकरे हे अत्यंत संयमी आणि सुसंस्कृत मुख्यमंत्री होते. त्यानुसार ते कामही करत होते”, असंही संजय राऊत म्हणाले.