“तो विषय आमच्यासाठी संपला, मी…”: राऊतांनी ‘त्या’ प्रश्नावर उत्तर देणं टाळलं

नवी दिल्ली : एकनाथ शिंदे शिवसेनेतील आमदारांना घेऊन भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. एकनाथ शिंदे गटाने विश्वासाचा ठरावही जिंकला आहे. तेव्हापासून महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात सर्वत्र आरोप – प्रत्यारोप सुरु आहेत. दरम्यान सत्तांतर झाल्यापासून सत्तेत आलेल्या शिंदे गटातील आणि भाजप पक्षातील अनेकांकडून संजय राऊत यांच्यावर देखील आरोप केले जात आहेत.
शिंदे गटाने बंडखोरी केल्यानंतर अनेक आमदार गुवाहाटीत असताना महाराष्ट्रात संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर केलेल्या टीका जिव्हारी लागल्या असल्याचं विधानसभेत आमदारांच्या बोलण्यातून स्पष्ट झालं. त्यावर बुधवारी नवी दिल्लीत संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील समन्वयावर प्रश्न विचारण्यात आले.
प्रश्न विचारल्यानंतर संजय राऊत संतापले आणि मी अशा प्रश्नांना उत्तर देणार नाही. आता नवीन सरकारचं बहुमत सिद्ध झालं आहे. त्यामुळं तो विषय आमच्यासाठी संपला आहे. काहीतरी महत्वाचं असेल तर विचारा असं उत्तर संजय राऊत यांनी माध्यमांसमोर बोलताना दिलं. त्याचबरोबर जे आमदार बंड करून सत्तेत सहभागी झाले त्यांना ईडी कडून दिलासा मिळत आहे. असा टोलाही संजय राऊत यांनी यावेळी लगावला.