महाविकास आघाडीत बिघाडी? सावरकर वादावर शिवसेनेची आक्रमक भुमिका!

मुंबई : (Sanjay Raut On Jayram Ramesh) स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेलं वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. सावरकरांचा अपमान खपवून घेणार नाही, अशामुळे महाविकास आघाडीत फूट पडू शकते असं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं.
दरम्यान, यावेळी काँग्रेसने सावध पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश म्हणाले, “मी सकाळीच संजय राऊतांशी बोललो, खूप दीर्घ चर्चा झाली. सावरकर प्रकरणावर त्यांचे आणि राहुल गांधींचे विचार वेगळे आहेत. मतभेदाच्या अधिकारावर आमचा विश्वास आहे असं बोलणं त्यांच्या-माझ्यात झालं. त्यामुळे याचा महाविकास आघाडीवर काहीच परिणाम होणार नाही असं संजय राऊतांनी सांगितल्याचं ते म्हणाले.
तिकडे संजय राऊत यांनीही जयराम रमेश यांनी फोन आल्याची माहिती दिली. संजय राऊत म्हणाले, ” भारत जोडो यात्रेत सहभागी असलेले जयराम रमेश यांनी माझ्याशी फोनवर चर्चा केली बराच वेळ आम्ही फोनवर बोललो. काही विषयांवर नक्कीच मतभेद आहेत त्या संदर्भात आम्ही माहिती उद्धव ठाकरे यांना दिली आहे”.
काल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सावरकरांवर आपली भूमिका स्पष्ट केली होती. राहुल गांधी यांनी सावरकर यांच्यावर केलेली वक्तव्य हे शिवसेनेला मान्य नाहीत. सावरकर हे महाराष्ट्रासाठी देशासाठी आदराचं आणि श्रद्धेचा विषय आहे विशेषता आमच्यासाठी, असं संजय राऊत यांनी ठणकावून सांगितलं.