ठाकरेंच्या शिवसेनेचे खुले आव्हान! म्हणाले, “PM मोदींनी मुंबई महापालिका जिंकून दाखवावी”
दौंड : (Sanjay Raut On Narendra Modi) ”भारतीय जनता पक्षाकडे जिंकण्याचे मनोबल असेल तर त्यांनी मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील अन्य महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका घेतल्या पाहिजेत. परंतु त्यांच्यामध्ये ते साहस नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मुंबईत येऊन प्रचार करावा आणि महिनाभर थांबून निवडणूक जिंकून दाखवावी”, असे थेट आव्हान शिवसेनेचे (ठाकरे गट) राज्यसभेतील वरिष्ठ खासदार संजय राऊत यांनी दिले आहे.
दौंड शहरात पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी हे आव्हान दिले. ते पुढे म्हणाले, की २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत वेगळा निकाल लागणार आहे. लोकांमध्ये भाजपविषयी नाराजी आहे आणि सत्तेसाठी सुरू असलेल्या कुरघोड्यांमुळे मनात अस्वस्थता आहे. पंतप्रधान मोदी यांनी अजित पवार यांच्यावर सत्तर हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्याचा जाहीररित्या आरोप केला; परंतु त्यानंतर लगेचच त्यांना सत्तेत सहभागी करून उपमुख्यमंत्री केले.
पुणे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवणे, शिवसेनेचे उपनेते साजन पाचपुते, जिल्हाप्रमुख शरद सूर्यवंशी, उप जिल्हाप्रमुख अनिल सोनवणे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार आदी या वेळी उपस्थित होते.
सत्तेविरूध्द बोलणारे आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंग यांना अटक करण्यात आली पण आम्ही चळवळीतून पुढे आलो असल्याने शरण जाणार नाही. संजय सिंग यांची अटक राजकीय आहे. भ्रष्ट आणि ओवाळून टाकलेल्या नेत्यांना भाजपने आपल्याकडे घेतले आहे परंतु सत्तेत परिवर्तन अटळ आहे.