“‘एक दुजे के लिए’ सिनेमाचा पडद्यावर अंत झाला तसाच राजकीय अंत होईल”

मुंबई | Sanjay Raut On Shinde Fadnavis Government – शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे फडणवीस सरकार आणि सेनेच्या बंडखोर नेत्यांवर निशाणा साधला आहे. शिवसेना सोडलेल्यांनी स्वतंत्र पक्ष तयार करावा, असा सल्ला संजय राऊत यांनी दिला आहे. तसंच शिंदे फडणवीस सरकारचा राजकीय अंत लवकरच होईल, असंही त्यांनी सांगितलं आहे.
आज (शनिवार) सकाळी संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बंडखोरांवर टीका करताना राऊत म्हणाले, ज्यांनी शिवसेना सोडलेली आहे त्यांनी शिवसेनेचा वापर करू नका. तुम्ही स्वतःचा स्वतंत्र पक्ष तयार करा. तुम्ही शिवसेना शिवसेना का करता? बाळासाहेब ठाकरे यांची ही खरी शिवसेना आहे. या शिवसेनेच्या पंखाखाली तुम्ही का जगता? तुम्ही स्वाभिमानासाठी बाहेर पडला असाल तर तुम्ही तुमचं स्वतंत्र स्थान निर्माण करा. शिवसेनेचा गैरवापर करू नका.
“हकालपट्टी करण्यात आलेले असे अनेक लोक आहेत जे शिवसेना भाजप युती असताना पराभूत झालेले आहेत, त्यांना भाजपचा पुळका आला आहे. महाराष्ट्राच्या जनतेत काय खळबळ माजली आहे हे आम्हाला माहित आहे आणि त्यावर स्पष्ट सांगतो. पण ज्यांनी ज्यांनी शिवसेना सोडली ते राजकारणातून अनेक वर्ष हद्दपार आहेत. आमदार आणि खासदार हे पराभूत झाल्याचा इतिहास आहे”, असंही संजय राऊत म्हणाले.
पुढे राऊत म्हणाले, “इतके दिवस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन मंत्रिमंडळ होऊ शकत नाही. नवीन सिनेमा राजकारणात सुरू आहे. ‘एक दुजे के लिए’ सिनेमाचा पडद्यावर अंत जसा झाला, राजकीय अंत सुद्धा त्याच पद्धतीने होईल. शिवसेनेतून बाहेर पडलेल्यांनी राजकीय आत्महत्या केली आहे.”