“मुख्यमंत्री शिंदेंच्या घोटाळ्यावर देवेंद्र फडणवीसांकडून सारवासारव…”, संजय राऊतांचा आरोप

मुंबई | Sanjay Raut – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) भूखंड घोटाळ्यामुळे चांगलेच अडचणीत आले आहेत. या भूखंड घोटाळ्यावरून राज्यातील विरोधी पक्षानं हिवाळी अधिवेशन दणाणून सोडलं आहे. विरोधकांनी या प्रकरणी एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यादरम्यान, एकनाथ शिंदेंवरील भूखंड घोटाळ्याचे आरोप गंभीर आहेत. त्यामुळे केंद्रातील प्रमुख लोकांना आम्ही कागदपत्रे पाठवली आहेत. ही कागदपत्रे योग्य ठिकाणी गेली आहेत, अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली आहे. तसंच शिंदेंच्या घोटाळ्यावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सारवासारव करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. ते राजधानी दिल्लीत माध्यमांशी बोलत होते.
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील आरोप गंभीर आहेत. देवेंद्र फडणवीस घाईघाईनं दिल्लीत आले आहेत. ते कशाला आले माहित नाही? पण नक्कीच त्यांची त्याविषयी चर्चा झाली असावी. एकनाथ शिंदे यांनी 110 कोटींचे भूखंड आपल्या मर्जीतील बिल्डरांना 2 कोटी रुपयांना दिले. जे 16 भूखंड गरिबांच्या घरांसाठी राखीव होते. काही निष्कर्ष त्यावर काढण्यात आले होते. तेव्हा भूखंड वाटपाला विरोध झाला होता. तरीही तेव्हाच्या नगरविकास मंत्र्यांनी आणि आताच्या मुख्यमंत्र्यांनी घाईघाईनं भूखंड वाटप केलं होतं. त्यावर कोर्टानं ताशेरे ओढले आहेत. आता न्यायालयाचं समाधान झालं असेल फक्त 24 तासात, तरीही तो भ्रष्टाचार आहे”, असं संजय राऊत म्हणाले.
पुढे ते म्हणाले, “एवढा मोठा भूखंड घोटाळा राज्यात झाला तरीही अण्णा हजारे या विषयावर गप्प का आहेत? असा प्रश्न मी नाही तर समाजमाध्यमातून विचारला जात आहे. बोहणीचा भ्रष्टाचार सरकारनं केला. 110 कोटींचं नुकसान झालं, 16 भूखंड बिल्डरांच्या घशात गेले तरी त्यावर कोणी काहीच बोलत नाही. यावर देवेंद्र फडणवीस सारवासारव करतात. ही मोदींच्या विचारधारेची फसवणूक आहे”, अशी टीकाही त्यांनी केली.