सूर्या की संजू! वर्ल्डकपची लॉटरी कोणाला लागणार, निर्णय उद्या होणार?
Sanju Samson Vs Suryakumar Yadav : भारतात होणाऱ्या आयसीसी वनडे वर्ल्डकप 2023 ला अवघे दोन महिने शिल्लक राहिले आहेत. मात्र अजून भारतीय संघाचे कॉम्बिनेशन सेट झालेले नाही. मधल्या फळीत सूर्यकुमार यादवला संधी द्यायची की संजू सॅमसनला याचा निर्णय अजून झालेला नाही. या दोघांपैकी कोणाच्या नावर शिक्कामोर्तब करायचं हे बहुदा वेस्ट इंडीज विरूद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात निश्चित होईल.
अजित आगरकरच्या नेतृत्वाखालील निवडसमिती लवकरच भारताच्या वर्ल्डकप 2023 साठीच्या संघाला अंतिम स्वरूप देतील. भारतीय वर्ल्डकप संघत मधल्या फळीसाठी श्रेयस अय्यर आणि केएल राहुल हे संघ व्यवस्थापनाची पहिली पसंती असतील. मात्र हे दोघेही सध्या एनसीएमध्ये दुखापतीतून सावरण्यासाठी घाम गाळत आहेत. त्यांच्या फिटनेसच्या प्रगतीवर सगळं अवलंबून आहे. दोघांचीही नुकतीच शस्त्रक्रिया झाली आहे. त्यांनी नेट्समध्ये फलंदाजीचा सराव देखील सुरू केला आहे.
या दोघांच्या अनुपस्थितीत मधल्या फळीसाठी संघ व्यवस्थापनाने सूर्यकुमार यादववर विश्वास दर्शवला. तो टी 20 मधील एक उत्तम फलंदाज आहे. मात्र वनडे क्रिकेटमध्ये त्याला त्याच्या लौकिकास साजेसा खेळ करता आला नाही. सुर्याने गेल्या 12 महिन्यात वनडे सामन्यात 13.60 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. त्याच्या तुलनेत संजू सॅमसनची सरासरी दमदार आहे. त्याने 73.66 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. मात्र असे असले तरी सूर्यकुमार यादववर रोहित आणि राहुल द्रविडने विश्वास दर्शवला असून त्यांनी सूर्याचे ट्रॅक रेकॉर्ड माहिती असून त्यालाच पाठिंबा दिला आहे.