‘सर्जा’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई | अनेक लव्हस्टोरींनी आतापर्यंत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले असले तरी प्रत्येक लव्हस्टोरीत काही ना काही वेगळेपण पहायला मिळतंच. ‘सर्जा’ (Sarja) या आगामी मराठी चित्रपटातही रसिकांना म्युझिकल लव्हस्टोरी पहायला मिळणार आहे. ग्रामीण बाजाच्या या चित्रपटात रसिकांना प्रेमातील आजवर कधीही लाईमलाईटमध्ये न आलेले पैलू पहायला मिळणार आहेत. सोशल मीडियाद्वारे ‘सर्जा’चं पहिलं पोस्टर लाँच केल्यानंतर रोमँटिक गाणं रसिकांचं लक्ष वेधून घेत आहे. ‘जीव तुझा झाला माझा…’ हे गाणं अल्पावधीतच लोकांच्या पसंतीस आले आहे.
राजवर्धन फिल्म्स क्रिएशनची प्रस्तुती असलेल्या ‘सर्जा’ची निर्मिती अमित जयपाल पाटील यांनी केली आहे. रमेश रंगराव लाड या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. धनंजय मनोहर खंडाळे यांनी ‘सर्जा’चं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटातील गाणे गीतकार वैभव देशमुख यांनी लिहिलेले आहे. ते गाणे संगीतकार हर्षित अभिराज यांनी अभय जोधपूरकर आणि वैशाली माडे यांच्या आवाजात संगीतबद्ध केले आहे.
दिग्दर्शनासोबतच धनंजय खंडाळे यांनी चित्रपटाची कथा, पटकथा, संवादलेखनही केलं असून, पार्श्वसंगीताची जबाबदारीही संगीतकार हर्षित अभिराज यांनीच सांभाळली आहे. या चित्रपटात अनिल नगरकर, रोहित चव्हाण, तुषार नागरगोजे, ऐश्वर्या भालेराव, आकाश पेटकर, ज्योति शेतसंधी, जगन्नाथ घाडगे, विष्णू केदार, प्रशांत पिसे, बालकलाकार गौरी खंडाळे, कुणाल गायकवाड आदी कलाकारांनी अभिनय केला आहे. राहुल मोतलिंग यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून, प्रशांत प्रल्हाद शिंदे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत. सुबोध नारकर यांनी संकलन केलं असून कला दिग्दर्शन सुनील लोंढे यांचं आहे. 14 एप्रिलला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.