नाशकात काँटे की टक्कर, शेवटच्या फेरीपर्यंत सामना रंगणार, हायव्होल्टेज लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष!
शिर्डी : (Satyajeet Tambe On Shubhangi Patil) गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पहिल्या फेरीत सत्यजीत तांबे यांनी आघाडी घेतली असली तरी दोन्ही उमेदवारांमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. मतदान केंद्रावर २८ टेबलांवर मतमोजणी होत आहे. या मतमोजणीपूर्वीच नाशिक पदवीधर मतदारसंघात मोठ्याप्रमाणावर मतं बाद ठरली आहेत. त्यामुळे विजयासाठी लागणाऱ्या मतांचा कोटा कमी झाला आहे. परिणामी ही मतमोजणी शेवटच्या फेरीपर्यंत रंगण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेल्या उमेदवार शुभांगी पाटील यांनी गुरुवारी सकाळी त्रंबकेश्वर येथे दर्शन घेतल्यानंतर शिर्डीत साई दरबारी हजेरी लावली. यावेळी त्या म्हणाल्या की, साईबाबांच्या दर्शनाने आत्मिक समाधान मिळाले. जनतेचा विजय होण्यासाठी बाबांना साकडं घातलं आहे. राज्यात कायदा-सुव्यवस्था आहे की नाही? आम्ही काहीही करु शकतो, हे या बॅनर्सच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न होत आहे. मला कोणीच रोखू शकत नाही, असे तुम्हाला वाटते. पण माझा विजय झाल्यानंतर सत्यजीत तांबे यांना हे बॅनर्स उतरवण्याची वेळ येईल, असे शुभांगी पाटील यांनी म्हटले.
पुण्यातल्या बाणेर परिसरात सत्यजीत तांबे यांच्या विजयाचे बॅनर झळकले आहेत. शिवसेनेचे दिवंगत माजी आमदार विनायक निम्हण यांचे सुपुत्र सनी निम्हण यांनी हे बॅनर्स लावले आहेत. जवळचे मित्र म्हणून आज त्यांनी सत्यजीत तांबेंचे बॅनर्स पुण्यात लावले आहेत. सत्यजीत तांबे यांनी अलीकडेच मी मोठ्या मताधिक्याने विजयी होईन, मला जिंकण्याची चिंता नाही, असे वक्तव्य केले होते. नाशिकमध्ये पहिल्या फेरीची मतमोजणी पूर्ण होत आली आहे. यामध्ये सत्यजीत तांबे हे ८००० मतांनी आघाडी घेतील, अशी शक्यता आहे.