सयाजी शिंदे-अजित पवारांमध्ये भेटी; रगेल अधिकाऱ्यांची तक्रार घेवून अभिनेता मंत्रालयात..
मुंबई : (Sayaji Shinde Meet Ajit Pawar) राज्यात वृक्षसंवर्धनाची चळवळ राबवून देवराई फुलवणारे जेष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी आज मंत्रालयामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. राज्य शासनाकडे वन विभागाची हजारो हेक्टर जमीन आहे. परंतु त्यात वृक्षसंवर्धन होत नाही. केवळ बोर्ड लावून जागा रिकामी पडून आहे. त्यामुळे त्या जागेत देवराई फुलवण्यासाठी मदत व्हावी, यासाठी अभिनेते सयाजी शिंदे यांनी अजित पवारांची मंत्रालयात भेट घेतली.
सयाजी शिंदे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, आज अजित पवार यांच्यासह देवेंद्र फडणवीसांचीही भेट होणार होती. परंतु ते जपानच्या दौऱ्यावर गेले आहेत. वृक्षसंवर्धनाच्या चळवळीत आम्हाला कसलाही फायदा नकोय. बायोडायव्हर्सिटीचे केवळ बोर्ड लागलेले आहेत. त्यात आम्हांला पडायचं नाहीये. परंतु आम्ही जे करतो त्यासाठी आवश्यकतेची गरज आहे.
वनविभाग, महसूल विभागाकडून सहकार्य मिळतंय, परंतु काही अधिकारी या टेबलावरुन त्या टेबलावर करतात, त्यामुळे वेळ वाया जातो. त्यामुळे सरकारकडून अशा वृक्षसंवर्धनाआड येणाऱ्या रगेल अधिकाऱ्यांना समज देण्यात यावा. व त्यांचंही सहकार्य मिळावं, यासाठी अजित पवारांची भेट घेतल्याचं त्यांनी सांगितलं.