ज्येष्ठ रंगकर्मी राजाभाऊ मोरे यांचं निधन, नाटक पाहत असतानाच घेतला अखेरचा श्वास

अमरावती | Rajabhau More – ज्येष्ठ रंगकर्मी राजाभाऊ मोरे (Rajabhau More) यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे. ते 78 वर्षांचे होते. रंगभूमीसाठी आयुष्य वेचणारे अशी राजाभाऊ मोरेंची ओळख होती. त्यांनी आयुष्यभर ज्या रंगभूमीची सेवा केली त्याच रंगभूमीसमोर राजाभाऊंनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर मनोरंजन विश्वातून शोक व्यक्त केला जात आहे.
गुरूवारी (15 डिसेंबर) राजाभाऊ मोरे हे संगीतसूर्य केशवराव भोसले सभागृहात राज्य नाट्य स्पर्धेतील नाटक पाहण्यासाठी गेले होते. त्यावेळी ‘थँक यु मिस्टर ग्लाड’ हे नाटक सुरू होते. यावेळी राजाभाऊ नाटक पाहत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण अमरावतीकर हळहळले आहेत.
यंदा राजाभाऊ मोरे यांना नाट्य परिषदेच्या वतीनं ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. अमरावती आणि आसपासच्या ग्रामीण भागत नाटक पोहोचवण्यामध्ये, नाट्य चळवळ उभी करण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. राजाभाऊंनी तेव्हाचे नाट्य परिषद अध्यक्ष प्रभाकर पणशीकर यांच्या मार्गदर्शनाखाली 33 वर्षांपूर्वी अमरावती नाट्य परिषदेची स्थापना केली होती.
राजाभाऊ यांच्या निधनानंतर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ट्विट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. “अमरावती येथील ज्येष्ठ रंगकर्मी श्री राजाभाऊ मोरे यांच्या निधनानं हौशी रंगकर्मीचा आधारवड हरपल्याचं दुःख आहे. रंगदेवतेचा वास असलेल्या नाट्यगृहात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी दिग्दर्शक, नेपथ्यकार म्हणून दीर्घकाळ हौशी व प्रायोगिक रंगभूमीची सेवा केली. राज्य नाट्य स्पर्धा हा त्यांचा श्वास होता. दीर्घकाळ त्यांनी राज्य नाट्य स्पर्धा गाजविली. या निष्ठावान रंगकर्मीच्या निधनानं नाट्यक्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे”, असं ट्विट सुधीर मनगंटीवार यांनी केलं आहे.
One Comment