प्रवचन, कीर्तन महोत्सवाचे उद्घाटन

पुणे : काही व्यक्ती त्यांचे वर्णन करणे, विशेषण देणे त्यांचे श्रेष्ठत्व वर्णावे अशा असतात. परंतु काही व्यक्ती अशा असतात, ज्यांच्यासमोर केवळ नतमस्तक व्हावे. कोणासमोर नतमस्तक व्हावे, हे कळणे म्हणजे जीवनाचे सौभाग्य आहे. आपण व्यक्तीला नाही तर पदाला नमस्कार करतो. पद मोठे आहे, पण प्रचीती मोठी नाही. सर्वांगीण जाणीव आपल्यामध्ये प्रकट होणे म्हणजे नतमस्तक होणे आहे, असे मत हभप चिन्मयमहाराज सातारकर यांनी व्यक्त केले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे चातुर्मासानिमित्त गणेश कला, क्रीडा मंच येथे आयोजित महोत्सवात प्रवचन, कीर्तन व श्री गणपती अथर्वशीर्ष निरुपण अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या महोत्सवाचे उद्घाटन नुकतेच झाले. यावेळी हभप भगवतीताई सातारकर-दांडेकर, ट्रस्टचे माणिक चव्हाण, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, हेमंत रासने, कुमार वांबुरे, राजाभाऊ घोडके, बाळासाहेब सातपुते, माऊली रासने आदी उपस्थित होते. हभप चिन्मयमहाराज सातारकर हे जगद्गुरू तुकाराममहाराजांचे निवडक अभंग या विषयावर निरुपण करीत आहेत.