दिल्लीत ८ दिवस ‘गंभीर’ प्रदूषण, हवेत किंचित सुधारणा
राजधानी दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी परिसरातील हवा अजूनही विषारी आहे. रविवारी सकाळी ७ च्या सुमारास दिल्लीत काही ठिकाणी हवा गुणवत्ता निर्देशांक ४०० च्या पुढे नोंदवण्यात आला. आनंद विहार परिसरात ४१२ हवा गुणवत्ता निर्देशांकासह प्रदूषणाची सर्वात धोकादायक पातळी दिसून आली. नोव्हेंबर महिन्यात जवळपास ८ दिवस गंभीर प्रदूषण होते. त्यामुळे दिल्लीतील हवा विषारी स्वरूपाची होती. मात्र गेल्या काही दिवसात दिल्लीच्या हवेत किंचित सुधारणा झाली.
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माहितीनुसार दिल्लीतील हवा गुणवत्ता निर्देशांक नोव्हेंबरमध्ये ३०० च्या पुढेच होता. त्यामुळे दिल्लीत ८ दिवस वाईट आणि १५ दिवस अत्यंत वाईट स्वरूपाची हवा होती. प्रदूषणामुळे मोठ्या प्रमाणात धुक्याची चादरीने दिल्लीला वेढले आहे. दिल्लीशिवाय मध्य भारतातील अनेक शहरे धुक्याच्या चादरीखाली आहेत. डिसेंबर – जानेवारीमध्ये धुके आणखी गडद आणि जास्त दिवस असू शकतात. येत्या काही दिवसात दिल्लीच्या तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे, त्यामुळे थंडीही वाढेल. हवामान खात्याने प्रदूषणाबाबत जाहीर केलेल्या नकाशानुसार दिल्लीसह हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल राज्य प्रदूषणाच्या गंभीर श्रेणीत आहेत.
दिल्लीतील लाल किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात देशभरातून पर्यटक येत असतात. मात्र प्रदूषणामुळे लाल किल्ल्यावर जाणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत घट झाली आहे. प्रदूषणाचा फटका दिल्लीतील पर्यटनालाही बसताना दिसत आहे. लाल किल्ल्याप्रमाणेच इतरही पर्यटन स्थळी गर्दी कमी होत असल्याचे दिसत आहे.