उथळ पाण्याचा खळखळाट

डोके मोजण्याच्या लोकशाहीतील प्रक्रियेमुळे दुर्दैवाने एका प्रकारे बुद्धिमत्तेपेक्षा झंुडशाहीला चालना मिळाली आणि त्यातून तानाजी सावंतसारखे उथळ लोक नेतृत्वाची दावेदारी करू लागले. हे राज्य सुस्थितीत चालावे, सामाजिक सद्भाव राखला जावा या भावनेपेक्षा आपल्या अहंकारी आणि मिजासखोर वृत्तीचे प्रदर्शन दाखविण्यात या लोकांना अधिक रस आहे.
सध्या राज्याच्या राजकारणात सर्वांत मोठी पंचाइत जर कोणाची झाली असेल, तर ती देवेंद्र फडणवीस यांची. राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून नाईलाजाने शपथ घेतली गेली तेव्हापासून त्यांच्या मागे काही ना काही शुक्लकाष्ठ लागले आहे. एक ब्राह्मण व्यक्ती म्हणून जन्माने जी जात चिकटली त्या जातीला न्याय देण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा त्या ‘जातीचा अडसर’ कुठे ठरू नये ही काळजी त्यांनी सतत पदोपदी घेतली आहे. म्हणूनच मराठा आरक्षणापासून ते ओबीसी आरक्षणापर्यंतच्या सर्व प्रश्नांना न्याय देण्याची प्रामाणिक भूमिका त्यांनी घेतली.
ती घेत असताना कधी घोषणाबाजी किंवा पोकळ आश्वासन देण्यापेक्षा न्यायालयाच्या माध्यमातून ही स्थिती कशी चिरकाल टिकेल आणि त्याचे दूरगामी योग्य परिणाम कसे पाहायला मिळतील, याचादेखील त्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास केला. परंतु म्हणतात ना, की आयुष्यभर जी जात नाही तीच जात आणि ती त्यांना चिकटल्यामुळे प्रत्येकाच्या मनात ती असतेच. या जातीचे शत्रुत्व समोर ठेवून सत्तेच्या जवळ जाण्यासाठी मतदानाचा टक्का वाढू शकतो का? हा प्रयत्न शरद पवार यांच्यासारख्यांनी देखील अनेकदा केला. म्हणूनच पेशवे आणि छत्रपतींची तुलना करत सामाजिक व्यवस्था बिघडविण्याचेदेखील वक्तव्य करण्याचे पाप त्या ज्येष्ठ नेत्याला करावे लागले. परंतु काँग्रेस काय, राष्ट्रवादी काय, शिवसेना काय… हे पक्ष काही ना काही तरी कारण काढून विरोधी पक्षाच्या नेता या दृष्टिकोनातून फडणवीस यांच्यावर हल्ले करत राहणार.
परंतु जेव्हा अति लाचारीने किंवा अति मिजासखोरीच्या भावनेने पक्षातीलच नेतृत्व काही बरळतात तेव्हा मात्र त्यांची मोठी पंचाईत होते. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आजचे केलेले वक्तव्य हे विनाकारण वाद ओढवून घेणारे आहे; परंतु ते केवळ अतिचापलुसीच्या वृत्तीने केलेले बेताल वक्तव्य आहे. हे खरे आहे, की मराठा आरक्षणाबद्दल भूमिका घेत असताना देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. परंतु ते त्यांनी ब्राह्मण समाजाचा व्यक्ती म्हणून घेतले नाहीत, तर बहुहित कशामध्ये आहे याची निर्णयप्रक्रिया डोळ्यासमोर ठेवून घेतलेला आहे. त्याला कधी ब्राह्मण समाजाने आक्षेप घेतला नाही आणि मराठा समाजाने तर घेण्याचा प्रश्नच नाही. या गोष्टी अंडरकरंट असतात. त्या सर्वांना माहीत असतात. परंतु अशी काही तरी वक्तव्ये करून पुन्हा एकदा त्यांचे ‘जात’ अधोरेखित करायची आणि कुणाला तरी हिणवण्याच्या दृष्टिकोनातून आपला लाळघोटेपणा करण्याच्या नादात अविचारी वक्तव्य करायचे हे त्यांना महागात ठरू शकते.
पुण्यामध्ये लोकसभेला देवेंद्र फडणवीस यांनी उभे राहावे ही भूमिका ब्राह्मण महासंघाने घेतली. तीदेखील त्यांना अडचणीची ठरली आहे. पुण्याला या निमित्ताने मोठे संभाव्य नेतृत्व मिळाले असते आणि सुरेश कलमाडी यांच्यानंतर जी पोकळी निर्माण झाली आहे ती भरून काढण्याची संधी मिळाली असती. परंतु ब्राह्मण समाजाने तो पुढाकार घेतल्याने पंचाईत झाली. पुन्हा एकदा या नेतृत्वावर ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर हा वाद होऊ शकतो, त्या दृष्टिकोनातून त्यांच्या नेतृत्वाकडे पाहिले जाऊ शकते म्हणून कदाचित ते आता होणे नाही. आरोग्यमंत्री सावंत हे डोके मोजण्याच्या प्रक्रियेतून पुढे आलेले झुंडशाहीचे उद्योजक असणारे नेतृत्व आहे. ग्रामीण मतदार आपल्या भविष्याचा दूरगामी विचार करत नाहीत. अनेकदा त्या मतदारांवर हायफाय राहणीमानाचा, बेधडक वक्तव्याचा किंवा केवळ प्रसिद्धीसाठी केलेल्या बेमालूम भावनाप्रधान वक्तव्यांचा पगडा असतो आणि त्या माध्यमातूनच ते मतदान होते. सावंत हे अशाच पद्धतीचे पुढे आलेले नेतृत्व आहे .
खरं तर त्यांनी उभ्या केलेल्या शिक्षण संस्था, साखर कारखाने एका आदर्श उद्योजकाचे द्योतक आहेत; परंतु त्याच्या पलीकडे ‘माणूस’ म्हणून त्यांचे विचार प्रतिगामी आणि निव्वळ सत्तालोलुप आणि कोणाच्या तरी जवळ जाण्यासाठी लाचारीचे द्योतक असणारे आहेत. आपल्याच पक्षाला आणि नेतृत्वाला अडचणीत आणतो याचे भान या वेळेस ते विसरले. एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील बहुतांश मंत्री हे अशा पद्धतीचे आहेत. उथळ पाण्याला खळखळाट फार असतो. त्या मानाने राष्ट्रवादीमध्ये किंवा भारतीय जनता पक्षामध्ये गांभीर्याने बोलणारे आणि विचारप्रवर्तक असे नेते आमदार आहेत. त्यामुळे एक संथ आणि खोली असलेले विचारप्रवृत्त मंत्री या राज्याने बघितले. दुर्दैवाने शिवसेना आणि त्यातूनच जन्म झालेल्या शिंदे सरकारच्या नेतृत्वाखालील आमदारांमध्ये संथपणा आणि ही खोली नाही. विचार तर अजिबात नाही. उथळ पाण्याचा हा खळखळाट या सरकारला आणि फडणवीस यांच्यासारख्या नेतृत्वाला बुडवू नये म्हणजे मिळवले.