मुंबई : (Shambhuraj Desai On Aaditya Thackeray) एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडखोरीमुळे राज्यभर शिवसेना खिळखिळी झाल्याचे पहायला मिळत आहे. त्यानंतर पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे सध्या राज्यभर शिवसंवाद दौरा काढत आहेत. यावेळी कार्यकर्त्यांना आणि जनतेला संबोधित करताना बंडखोरांवर चांगलेच तुटून पडताना पहायला मिळत आहेत. त्यांच्या टिकेला प्रत्युत्तर देताना बंडखोर आमदार शंभूराज देसाई म्हणाले, तुम्ही मंत्री असताना, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना, आपण किती दौरे केलेत, असा सवाल शंभुराज देसाई यांनी आदित्य ठाकरेंना उपस्थित केला.
दरम्यान पुढे बोलताना देसाई म्हणाले, सध्या मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना सरकारी बैठकांसाठी सतत दिल्लीला जावे लागत आहे. दिल्लीत येथे निती आयोगाची बैठक असून या बैठकीला सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रित करण्यात आले होते. मला आदित्य ठाकरे यांना नम्रपणे सांगायचे आहे की, महाराष्ट्रात इतर जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दौरे झाले, त्याकडेही थोडे लक्ष द्या. मुख्यमंत्री सरकारी बैठकांसाठी दिल्लीला जात असतील तर त्यांच्यावर टीका करणे योग्य नाही, असे शंभुराज देसाई यांनी म्हणाले आहेत.
आदित्यजी आपण महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता गेल्यानंतर दौरे करत आहात. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना तुम्ही किती दौरे केले होते, याकडे प्रथम तुम्ही लक्ष द्यावे. आता सत्ता गेली, ५५ पैकी ४० आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एकटवले आहेत, शिवसैनिक पक्ष सोडून जात आहेत. आदित्य ठाकरे महाराष्ट्रात दौरे करतात ही चांगली गोष्ट आहे. यानिमित्ताने लोकांना त्यांचे दर्शन घडत आहे असा खोचक टोला देसाईंनी लगावला आहे.