“…ती बेईमानी नव्हती का?”, शंभुराज देसाईंचा अजित पवारांना खोचक सवाल
मुंबई | Shambhuraj Desai On Ajit Pawar – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. अजित पवारांनी शिर्डी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना एकनाथ शिंदेंवर त्यांचं नाव न घेता टीका केली. पक्ष बदलणं गैर नाही परंतु आपण ज्या घरात वाढलो ते घरच उध्वस्त करायला निघणं ही बेईमानी आहे, असं पवार यांनी म्हटलं आहे. त्यांनी केलेल्या या विधानावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. यामध्ये राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी अजित पवारांच्या टीकेला खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.
“2019 मध्ये जे 48 तासांचं सरकार तुम्ही केलं होतं, ती बेईमानी नव्हती का? तुमच्या पक्षाचे काही आमदार घेऊन तुम्ही पहाटेचा शपथविधी केला. तो करताना शरद पवार जे तुमच्या पक्षाचे प्रमुख आहेत त्यांची परवानगी घेतली होती का? त्यांना विचारलं होतं का? असा जर प्रश्न तुम्हाला आम्ही विचारला तर तुम्हाला ते योग्य वाटणार नाही”, असंही शंभुराज देसाई म्हणाले.
“आपला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षासोबत जाऊन मुख्यमंत्री होणं एकवेळेस समजू शकतो. त्यात गैरवाटण्याचं एकवेळ कारण नाही. पण ज्या घरात वाढलो, ज्या घरात आपण घडलो ते घरच उध्वस्त करायला निघणं ही बेईमानी महाराष्ट्रातील लोकांना अजिबात पटलेली नाही”, असं अजित पवार म्हणाले होते.