“मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांनी…”, शंभूराज देसाईंची टीका

पंढरपूर | Shambhuraj Desai On Uddhav Thackeray – राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचं ऐकल्यामुळेच शिवसेनेची, विशेषतः उद्धव ठाकरे गटाची आज ही अवस्था झाली आहे, अशी टीका देखील शंभूराज देसाईंनी केली आहे. ते आज (21 सप्टेंबर) पंढरपूर येथे शिवसेनेतील शिंदे गटाच्या हिंदू गर्व गर्जना मेळाव्यास आले होते. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
यावेळी शंभूराज देसाई म्हणाले, “शरद पवारांना आजकाल उद्धव ठाकरे यांची फारच चिंता लागली आहे, असं आम्हाला वाटतं. आमचं सर्वांचं म्हणणं आहे की, पवारांचं जास्त ऐकल्यामुळेच शिवसेनेची (Shivsena), विशेषत: उद्धव ठाकरे गटाची ही अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत निवडणूकीचे निकाल पाहिले, तर शिवसेना उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात चौथ्या, पाचव्या क्रमांकावर फेकली गेली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी याचा विचार करायला हवा”.
“शरद पवार असं का बोलत आहेत? असं बोलण्यामागे त्यांचा उद्देश काय आहे? वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांचं सोनं लुटण्याचा अधिकार आम्हालाच आहे. कारण केवळ राज्यातील सत्तेसाठी, मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या विचारांवरील नैसर्गिक सेना भाजपची युती सोडली आणि काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत अनैसर्गिक युती केली होती. ते महाराष्ट्रातील जनतेलाही मान्य नव्हतं,” असंही शंभूराज देसाई म्हणाले.