शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा; नागरिकांनी भेटण्यासाठी लावली गोविंद बागेपुढे रांग
बारामती | काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना बारामतीतील एका संस्थेच्या बैठकीदरम्यान अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांची तात्काळ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली होती. तपासणीनंतर डॉक्टरांनी पवार यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. येथील विद्या प्रतिष्ठानच्या बैठकीसाठी पवार आले होते. यावेळी त्यांना अचानक त्रास जाणवू लागल्याने त्यांची डॉक्टरांकडून तपासणी करण्यात होती. दरम्यान त्यांच्या तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी नागरिक त्यांच्या गोविंद बाग येथील निवासस्थानी सकाळपासून येत आहेत.(Sharad Pawar Health Update)
दरम्यान, काल विद्या प्रतिष्ठानच्या बैठकीदरम्यान त्यांना अस्वस्थ असल्याचे जाणवत होते. त्यानंतर त्यांची कन्या खासदार सुप्रिया सुळे यांना सांगितले असता सुळे यांनी तात्काळ येथील हृदयरोग तज्ञ डॉ रमेश भोईटे, डॉ. सनी शिंदे यांच्यामार्फत तपासणी केली. सततचे कार्यक्रम व प्रवासामुळे त्यांना थकवा आल्याने डॉक्टरांनी त्यांना आरामाचा सल्ला दिला आहे. दरम्यान, आज सकाळी डॉक्टरांकडून पवार यांची तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर पुन्हा पवारांना नागरिक भेटत आहेत.
दिवाळीनिमित्त शरद पवारांसह पवार कुटुंबीय बारामतीत असतात. दीपावलीच्या शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक नागरिक बारामतीत येत असतात. पवारांना दिवाळीच्या शुभेच्छा देत त्यांच्यासोबत हस्तांदोलन करून त्यांच्या समवेत फोटो घेण्यासाठी अनेकजण इच्छुक असतात. यासाठी झुंबड उडत असते. पवारही येणाऱ्या प्रत्येकाच्या शुभेच्छा स्वीकारत व शुभेच्छा देतात.