‘इंडिया’ मध्ये होतोय संभ्रम!

शरद पवार दिल्लीत की पुण्यात?
पुणे | Sharad Pawar – संसदेत येत्या मंगळवारी केंद्र सरकारच्या एका अध्यादेशावर मतदान होणार असून, या अध्यादेशाविरोधात मतदानासाठी सर्व विरोधी पक्ष एकवटले असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) संसदेत जाणार की, मोदींसमवेतच्या कार्यक्रमासाठी पुण्यात थांबणार? याची चर्चा सुरू झाली आहे. दिल्लीच्या राज्य सरकारमधील बदल्यांवर निर्बंध घालण्याचा अध्यादेश मोदी सरकारने काढला आहे.
अध्यादेश म्हणजे मोदी सरकारच्या हुकूमशाही प्रवृत्तीचे प्रतीक आहे. त्याविरोधात सर्व विरोधी पक्षांनी लोकसभा आणि राज्यसभेत मतदान करण्याचा निर्णय घेतला असून, त्यात ‘इंडिया’तील काँग्रेस, आम आदमी पार्टी, राष्ट्रीय जनता दल, शिवसेना (उबाठा), तृणमूल काँग्रेस आदी २६ घटक पक्षांचा समावेश आहे. येत्या सोमवारी लोकसभेत अध्यादेश मंजूर करून घ्यावयाचा आणि लगेच दुसऱ्या दिवशी राज्य सभेत विधेयक मांडून, ते मंजूर करून घ्यावयाचे अशी केंद्र सरकारची योजना आहे.
लोकसभेत भाजप आणि आघाडीचे बहुमत आहे. त्यामुळे लोकसभेत विधेयक मंजूर होईल. सरकारची कसोटी राज्यसभेत लागणार आहे. परंतु, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. आर. रेड्डी यांनी मोदींना पाठिंबा दिल्याने राज्यसभेतही सरकारचे पारडे जड झाले. मात्र, विरोधी पक्षांची एकजूट मतदानात दिसावी असा मतप्रवाह आहे. नेमके त्याच दिवशी लोकमान्य टिळक पुरस्कार स्वीकारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येणार आहेत आणि शरद पवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
केजरीवालांची विनंती :
–अध्यादेशाचे गांभीर्य लक्षात घेऊन शरद पवार यांनी दिनांक १ ऑगस्टला पुण्यात न थांबता दिल्लीत यावे आणि मतदानासाठी राज्यसभेत हजर राहावे, अशी विनंती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पवार यांना केली. त्यामुळे शरद पवार १ ऑगस्टला मोदींच्या कार्यक्रमात उपस्थित राहाणार की, मोदी सरकारच्या विरोधात मतदानासाठी राज्यसभेत दिल्लीत हजेरी लावणार, असा प्रश्न निर्माण झाला.
–रोहित टिळक यांच्या माहितीनुसार शरद पवार पुण्यातच थांबणार असून, मोदींना पुरस्कार देण्याच्या समारंभात उपस्थित राहाणार आहेत.