“मी काही मागत नाही, तेवढं बेळगाव देऊन टाका”; शरद पवारांच्या मिश्कील टिप्पणीने कार्यक्रमात खसखस पिकली
!["मी काही मागत नाही, तेवढं बेळगाव देऊन टाका"; शरद पवारांच्या मिश्कील टिप्पणीने कार्यक्रमात खसखस पिकली pune news 13](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2023/01/pune-news-13.jpg)
पिंपरी | राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते एका खासगी रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादाचा प्रश्न धगधगता असताना शरद पवार यांनी एक मिश्किल विधान केलं आहे. या विधानामुळे कार्यक्रमात एकच खसखस पिकली.
शरद पवार यांच्या हस्ते ज्या खासगी रुग्णालयाचे उद्घाटन झाले त्या रुगानालायाचे संस्थापक प्रभाकर कोरे हे आहेत. ते कर्नाटकात राहतात. ते शरद पवार यांचे घनिष्ट मित्र देखील आहेत. शरद पवार यांनी प्रभाकर कोरे यांच्या संस्थेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या अनेक प्रकल्पांचे उद्घाटन केलेले आहे. कालही त्यांनी कोरे यांच्या या नव्या खासगी रुग्णालयाचं उद्घाटन केलं. त्यावेळी शरद पवार यांनी हे मिश्किल विधान केलं.
यावेळी शरद पवार म्हणाले, कोरे यांनी काही नवीन काढलं की मला उद्घाटनला जावं लागतं. मग ते कर्नाटकात असो की महाराष्ट्रात असो. ही अनेक वर्षाची परंपरा आहे. नेहमीच त्यांना सांगतो, तुमची इतकी उद्घाटनं मी केली. मी काही मागत नाही. तो बेळगाव देऊन टाका आणि प्रश्न संपवून टाका, असं मिश्किल विधान शरद पवार यांनी केलं. तेव्हा सभागृहात एकच खसखस पिकली.
पुढे शरद पवार म्हणाले, चेष्टेचा भाग सोडून द्या. आज बेळगावच्या भागातील जनतेच्या हिताची जपणूक कोरे यांची संस्था करत आहे. वैद्यकीय क्षेत्रात ज्या काम करणाऱ्या उत्तम संस्था आहेत त्यात कोरे यांची संस्था आहे. ही संस्था बेळगावमध्ये चांगलं काम करत आहे. त्याचा परिणाम म्हणजे बेळगावमधील सर्व घटकांचा यांच्या संस्थेवर विश्वास आहे, असं ते म्हणाले.