“एका रानकवीचं पावसाळ्यातच निधनं व्हावं हा…”; महानोरांच्या आठवणींना उजाळा देत पवार भावूक
मुंबई : (Sharad Pawar On N. D. Mahanor) ना. धों. महानोर यांच्या निधानानं महाराष्ट्रानं मोठा साहित्यिक आणि कवी गमावला आहे. त्यामुळं विविध क्षेत्रातून त्यांच्या निधनावर प्रतिक्रिया येत आहेत. महानोर यांचे निकटवर्तीय मित्र असलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देखील सोशल मीडियावर दीर्घ पोस्ट लिहित त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. एका रानकवीचं पावसाळ्यातच निधनं व्हावं, हा योग मनाला चटका लावणारा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
पवार म्हणतात, “माझे जवळचे मित्र आणि महाराष्ट्राचा रानकवी ना. धो. महानोर यांच्या निधनाने मला अतिशय दुःख झालं आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड खेड्यात गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या ना. धों. याचं बालपण कष्टात गेलं पण कष्ट झेलताना त्यांचं संवेदनशील मन रानात रमलं. तिथेच त्यांच्या सर्जनशीलतेला धुमारे फुटले. ना. धो. यांच्या कवितांनी रानातल्या कविता, पावसाळी कवितांनी, जैत रे जैत सारख्या अनेक चित्रपट गीतांनी मराठी माणसांच्या मनावर गारूड केलं.
ना. धों. ची विधान परिषदेतील भाषणं देखील माणसाच्या काळजाचा ठाव घेत असतं. ते खूपच हळवे होते, पत्नीच्या निधनानं ते आणखी खचले. मी, प्रतिभा त्यांच्या खचलेल्या मनाला उभारी देत राहिलो. पण अखेर हा वृक्ष उन्मळून पडला. ना. धो. चं निधन देखील पावसाळ्याच्या दिवसांत व्हावा हा योग मनाला चटका लाऊन जाणारा आहे. मी आणि माझ्या कुटुंबियांतर्फे या मृदू मनाच्या निसर्गकवीला श्रद्धांजली अर्पण करतो”.