शरद पवार PM मोदींसमोरच म्हणाले, देशातील पहिला ‘सर्जिकल स्ट्राईक’ लाल महालात झाला..
पुणे : (Sharad Pawar On Narendra Modi) सर्जिकल स्ट्राईकचा उल्लेख आज होतोय पण यापूर्वीच या पुण्यातचं सर्जिकल स्ट्राईक झाला होता. हा सर्जिकल स्ट्राईक छत्रपती शिवाजी महाराजांकडून लाल महालात झाला असल्याचा इतिहासच शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर सांगितला. पुण्यात पार पडलेल्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. हा पुरस्कार PM मोदींना प्रदान करण्यात येत आहे.
शरद पवार म्हणाले, “यादवांचं संस्थान असेल किंवा दिल्लीतील मुघलांचं संस्थान असेल अशी अनेस संस्थानं या देशात होऊन गेली. पण महाराष्ट्रात शिवछत्रपतींचं कार्य एका वेगळ्या दिशेनं होतं. त्यांनी राज्य उभं केलं. पण ते भोसल्याचं राज्य नव्हतं ते हिंदवी स्वराज्य होतं. ते रयतेचं राज्य होत. हे रयतेचं राज्य प्रस्थापित करण्याचं काम या पुणे शहरात झालं. हा पुण्याचा एक गौरवशाली इतिहास आहे”
“या देशाच्या जवानांनी देशाचं रक्षण करण्यासाठी एक प्रकारचं सर्जिकल स्ट्राईक केला होता. सर्जिकल स्ट्राईकची चर्चा आत्ता होते. पण लाल महालात शाईस्तेखानानं ताबा घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर या देशातील पहिला सर्जिकल स्ट्राईक यादेशात झाला ही गोष्ट विसरता येणार नाही,” अशा शब्दांत पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोरच इतिहासाचा उल्लेख केला.