ताज्या बातम्यादेश - विदेशरणधुमाळी

अजित पवार नव्हे, पीए संगमा यांनी शरद पवारांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी केली होती, पण…”

मुंबई : (Sharad Pawar On PA Sangama) राष्ट्रवादी कुणाची आणि घड्याळ चिन्ह (Nationalist Congress Party) कुणाचं या मुद्द्यावरून आता शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार गट निवडणूक आयोगामध्ये जोरदार युक्तिवाद सुरू आहेत. सर्वाधिक आमदारांचा आणि पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा हा आपल्यालाच असल्याचा दावा अजित पवारांनी केला आहे आणि त्याच मुद्द्यावरून शरद पवारांच्या अध्यक्षपदावर आक्षेप घेतला.

अजित पवार गटाकडून शरद पवारांची या आधीच अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. निवडणूक आयोगामध्येही तसे मुद्दे मांडत राष्ट्रवादी आपलीच असल्याचा दावा अजित पवारांनी केला. पण राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून शरद पवारांची हकालपट्टी करण्याची घोषणा करणारे अजित पवार हे पहिले नेते नाहीत. त्या आधीही 2004 साली पीए संगमा (P. A. Sangma) यांनी शरद पवारांची हकालपट्टी करण्याची घोषणा केली होती आणि स्वतःला अध्यक्ष असल्याचं जाहीर केलं होतं.

सोनिया गांधी यांच्या विदेशीपणाच्या मुद्द्यावर आक्षेप घेत शरद पवार, तारिक अन्वर आणि पीए संगमा या काँग्रेसच्या तीन नेत्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवार हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष बनले. नंतर शरद पवारांनीच काँग्रेससोबत युती केली आणि महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. हीच गोष्ट राष्ट्रीय स्तरावरही करत 2004 सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस सोबत जाण्याचा निर्णय घेतला.

पीए संगमा यांनी शरद पवार यांच्या या भूमिकेला विरोध केला. राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेस सोबत जाऊ नये अशी भूमिका त्यांनी मांडली. पीए संगमा यांच्या विरोधानंतरही शरद पवारांनी आपली भूमिका कायम ठेवत काँग्रेस सोबत जाण्याचा निर्णय कायम ठेवला. त्यानंतर मात्र राष्ट्रवादीमध्ये फूट पडली. पीए संगमा यांनी 2004 साली शरद पवारांची पक्षातून हकालपट्टी केल्याची घोषणा केली आणि स्वतःला राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी घोषित केलं. त्याचसोबत पीए संगमा यांनी निवडणूक आयोगात धाव घेत राष्ट्रवादी पक्षावर आणि घड्याळ चिन्हावरही दावा केला.

राष्ट्रवादी काँग्रेस आपलाच असल्याचा दावा करत संगमा यांनी घड्याळ चिन्ह आपल्यालाच मिळावं अशी मागणी निवडणूक आयोगासमोर केली. घड्याळ चिन्ह जर आपल्याला मिळालं नाही तर ते गोठवण्यात यावं असाही पर्याय ठेवला. आपण राष्ट्रवादीच्या संस्थापकापैकी एक असल्याचं सांगत पदाधिकाऱ्यांचाही पाठिंबा आपल्यालाच असल्याचा दावा संगमा यांनी केला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये