कंत्राटी पोलीस भरतीवरुन शरद पवारांचा सरकारवर निशाणा! म्हणाले, “सरकार बदलण्याची वेळ”
मुंबई : (Sharad Pawar On Shinde-Fadnavis Government) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत पदाधिकारी मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना, यावेळी त्यांनी सरकारवर निशाणा साधला. तसंच अजित पवार गटाला देखील सुनावले. कंत्राटी पोलीस भरतीवरुन त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. कंत्राटी पोलीस भरती निर्णय घातक असल्याचे शरद पवार म्हणाले.
कधीकाळी आपल्यासोबत काम करणाऱ्या लोकांनी वेगळा रस्ता स्विकारला आहे आणि त्यांनी सुद्धा त्यांच्या अध्यक्षांची निवड केली. काही लोकांनी दिल्लीच्या दोन कोर्टात आपल्याला नेले आहे. एक निवडणूक आयोग आणि दुसरं सप्रीम कोर्ट. या दोन्ही ठिकाणी आपल्या खऱ्या राष्ट्रवादीला संघर्ष करण्याचा प्रसंग आपल्या जुन्या सहकाऱ्यांनी आणला. जेव्हा निकाल लागले तेव्हा सामान्य राष्ट्रवादी कार्यकर्त्याच्या बाजुने निकाल लागेल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.
पक्षाच्या वतीने जितेंद्र आव्हाड आणि सुप्रिया सुळे हे वकिलांना लागेल ती माहिती देत असतात. राज्यात आपलं सरकार गेलं पण तुम्ही लक्षात घ्या देशभरात भाजपसोबत जे लोक आहेत त्यांच्यासोबत इतर लोक जावू इच्छीत नाहीत. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सरकार होत पण नंतर आमदार फुटले. दिल्ली पंजाब उत्तराखंड झारखंड पश्चिम बंगाल कोणत्या राज्यात भाजप आहे?, असा प्रश्न शरद पवार यांनी उपस्थित केला.
आर आर पाटील लोकप्रिय गृहमंत्री होते. माहिती कशी काढावी, निर्णय कसा घ्यावा त्यांना चांगल माहित होत. कधी कुणी तक्रार केली नाही. आता त्या सगळ्या गोष्टी नाहीत. पोलिसांची कंत्राटी भरती हा निर्णय कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे तसेच पोलीस कुटुंबांच्या दृष्टीने देखील चुकीचा आहे. त्यामुळे हे सरकार बदलण्याची घोषणा आपल्याला केली पाहिजे, असे शरद पवार म्हणाले.