“शिवसेनेत बंड होणार हे शरद पवारांना माहिती होत”; अजित पवारांचा गौप्यस्फोट
पुणे | 20 जून रोजी विधानपरिषदेची निवडणूक पार पडल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नॉट रिचेबल झाले होते. विधानसभेतून ठाणे, मग सुरत, त्यानंतर गुवाहाटी, तिथून पुढे गोव्यापर्यंत त्यांनी अनेक झाडी, डोंगर आणि हॉटेल असा राजकीय प्रवास केला. 20 ते 30 जून या दहा दिवसांत शिंदे यांच्या बंडाने महाराष्ट्राचं राजकीय समीकरण पूर्णपणे बदलून गेले. त्यामुळे शिवसेनेत दोन गट पडले. शिंदे गटाने नंतर राज्यात सत्ताही स्थापन केली. शिवसेनेच्या या बंडावर राष्ट्रवादीचे नेते, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोठं विधान केलं आहे.
पुण्यात एका मुलाखती दरम्यान अजित पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिवसेनेत बंड होणार हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना माहीत होतं. त्याबाबतची माहिती त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना दिली होती, असे अजित पवार म्हणाले.
नेमकं काय म्हणाले अजित पवार ?
“आमदार फुटणार असल्याची महिती उद्धव ठाकरेंना दोन, तीन वेळा दिली होती शरद पवार साहेबांनी फोन करुन उद्धव ठाकरेंसोबत मीटिंग केली होती. पण माझ्या आमदारावर माझा विश्वास आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. पण स्वत: पक्ष नेतृत्वाने आपल्या आमदारांवर डोळे झाकून विश्वास टाकला. तिथेच खरी गफलत झाली,” असं अजित पवार म्हणाले.